जुन्या मालकाला संपवलं, आता तुमची पाळी! नव्या घरात सापडली बाहुली अन् थरकाप उडवणारी चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:34 PM2021-09-20T15:34:41+5:302021-09-20T15:36:24+5:30
नव्या घरात सापडलेल्या बाहुली आणि चिठ्ठीनं मालकाचा थरकाप उडाला
लिव्हरपूल: नव्या घरात सापडलेल्या बाहुलीमुळे आणि तिच्याकडे असलेल्या चिठ्ठीमुळे मालकाला धक्का बसला आहे. इंग्लंडमधल्या लिव्हरपूलमध्ये नवं घर खरेदी करणाऱ्या ३२ वर्षांच्या जोनाथन लेवीस यांना जिन्याखाली असलेल्या मोकळ्या जागेत एक बाहुली आढळून आली. तिच्या हातात असलेली चिठ्ठी वाचून लेवीस यांना धक्काच बसला.
शुक्रवारी लेवीस यांना नव्या घराची किल्ली मिळाली. घर पाहत असताना जिन्याखाली पोकळी असल्याचं लेवीस यांच्या लक्षात आलं. त्यांनी हातोडाच्या मदतीनं प्लास्टरबोर्ड फोडला. तिथे त्यांना एक बाहुली दिसून आली. तिच्या हातात एक चिठ्ठी होती. घराच्या मूळ मालकांना मी १९९१ चाकू भोसकून संपवलंय तुम्हाला छान झोप येईल अशी आशा आहे, असा मजकूर त्या पत्रात होता.
या प्रकरणी लेवीस यांनी एस्टेट एजंटकडे विचारणा केली. त्यावर घराच्या डागडुजीचं काम चार ते पाच वर्षांपूर्वी करण्यात आलं आहे. त्याचवेळी जुन्या घर मालकानं चिठ्ठी ठेवली असावी, असं उत्तर त्यानं दिलं. बाहुली आणि चिठ्ठी सापडल्यानंतर अनेकांनी लेवीस यांना नवं घर सोडण्याचा सल्ला दिला आहे. लेवीस हे पेशानं शिक्षक आहेत.
त्या चिठ्ठीत नेमकं काय?
'प्रिय वाचक/नवे घर मालक, मला मुक्त केल्याबद्दल धन्यवाद! माझं नाव एमिली आहे. माझे नवे मालक १९६१ मध्ये इथे राहायचे. मला ते आवडायचे नाहीत. त्यामुळे त्यांना जावं लागलं. ते गाणी गायचे आणि आनंदात राहायचे. मला ते आवडायचं नाही. मला भोसकून मारायला आवडतं. त्यामुळे तुमच्याकडे सुऱ्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला छान झोप येईल अशी आशा आहे,' असा मजकूर चिठ्ठीत आहे.
घरात बाहुली कशा सापडली याचा संपूर्ण घटनाक्रम लेवीस यांनी सांगितला. 'मी नुकतंच घर खरेदी केलं आणि शुक्रवारी मला किल्ली मिळाली. मला जिन्याखालील जागेत पोकळी असल्याचं जाणवलं. तिथे प्लास्टरबोर्ड होता. जुन्या मालकानं तिथेच फ्रीज ठेवला होता. प्लास्टरबोर्डजवळून वायर बाहेर आल्याचं मला दिसलं. त्यामुळे तिथे नेमकं काय आहे हे पाहण्याासाठी मी हातोडीनं ठोकून पाहिलं. मी तिथे एक छिद्र केलं. त्यातून टॉर्च पाहून मारून पाहिला तेव्हा मला बाहुली दिसले. मग मी हातोड्यानं छिद्र मोठं केलं आणि बाहुली बाहेर काढली, असं लेवीस यांनी सांगितलं.