नव्या मानवी अवयवाचा लागला शोध!

By admin | Published: January 5, 2017 04:03 AM2017-01-05T04:03:23+5:302017-01-05T04:03:23+5:30

मानवी शरीरात उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेल्या दुपेडी आवरणात दडलेला व साध्या डोळ्यास न दिसणारा ‘मेसेन्टरी’ हा एक स्वतंत्र अवयव असल्याचे वैज्ञानिकांनी चार वर्षांच्या संशोधनानंतर जाहीर केले आहे.

A new human body started! | नव्या मानवी अवयवाचा लागला शोध!

नव्या मानवी अवयवाचा लागला शोध!

Next

लंडन : मानवी शरीरात उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेल्या दुपेडी आवरणात दडलेला व साध्या डोळ्यास न दिसणारा ‘मेसेन्टरी’ हा एक स्वतंत्र अवयव असल्याचे वैज्ञानिकांनी चार वर्षांच्या संशोधनानंतर जाहीर केले आहे. अशा प्रकारे स्वतंत्रपणे गणल्या गेलेल्या ज्ञात मानवी अवयवांची संख्या ७९वर पोहोचली आहे.
आयर्लंडमधील लिमेरिक विद्यापीठाच्या इस्पितळात स्वादूपिंडावर शस्त्रक्रिया करताना शल्यक्रिया विभागाचे प्राध्यापक जे. काल्विन कॉफे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मेसेन्टरी’चे स्वतंत्र स्थान निश्चित करण्यासाठी सन २०१२ पासून सूक्ष्मदर्शक यंत्रातून अथक निरीक्षण व अभ्यास केला. यावरून ‘मेसेन्टरी’ला स्वतंत्र अवयवाची ओळख देणारा त्यांचा सविस्तर शोधनिबंध ‘लॅन्सेट’ या जगन्मान्य वैज्ञानिक नियतकालिकाच्या ताज्या अंकाच्या ‘गॅस्ट्रेएन्टेरॉलॉजी अ‍ॅण्ड हेपॅटोलॉजी’ विभागात प्रसिद्ध झाला आहे.
‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या संशोधनाची सत्यता वैज्ञानिकच आपसात तपासून प्रमाणित करीत असल्याने ‘मेसेन्टरी’चे स्वतंत्र अवयव म्हणून अस्तित्व अधिकृतपणे जाहीर झाल्याचे मानले गेले आहे. आंग्लवैज्ञकातील शरीरशास्त्राचे बायबल म्हणून मानल्या गेलेल्या ‘ग्रे‘ज अ‍ॅनॉटोमी’ या पाठ्यपुस्तकातही ‘मेसेन्टरी’ची स्वतंत्र अवयव म्हणून नोंद घेण्यात आली आहे. वैद्यक शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश करण्यात आला आहे.
‘मेसेन्टरी’चा शब्दश: अर्थ ‘आतड्यांच्या आतमध्ये असलेले’ असा होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेल्या दुपेडी आवरणात हे ‘मेसेन्टरी’ असते. या आवरणामुळे मोठया आतड्याचे वेटोळे अघळपघळ न पसरता उदर पोकळीत एका जागी स्थिर राहते. लिओनार्दो द्् व्हिन्सी या मध्ययुगीन प्रज्ञावंतांने त्याच्या लेखनात ‘मेसेन्टरी’चा उल्लेख केला होता. परंतु कोणतेही फारसे महत्व नसलेले शरीरातील एक पेशीबंध म्हणून कित्येक शतके त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नव्हते. गेल्या शतकभरात काही निवडक डॉक्टमंडळींनी ‘मेसेन्टरी’चा अभ्यास जरूर केला. पण त्यांनी त्याची रचना एकसंध नव्हे तर अनेक तुकड्यांमध्ये विभागलेली मानली होती. आता प्रा. कॉफे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा समज चुकीचा ठरवून ‘मेसेन्टरी’ हा एक सलग रचना असलेला स्वतंत्र अवयव असल्याचा सिद्धांत मांडला आहे.
मानवी शरीर ही सजीव सृष्टीतील अगाध रचना आहे. यात प्रत्येक पेशीला व अवयवाला स्वतंत्र ओळख, स्वतंत्र स्थान व स्वतंत्र कार्य आहे. काही तरी ठराविक आणि ज्यावाचून शरीराचा जैविक गाडा सुरळितपणे चालणार नाही असे काही तरी नेमून दिलेले ‘मेसेन्टरी’चे कार्य असल्याखेरीज त्याचे शरीरातील अस्तित्व निरर्थक मानणे हे वैज्ञानिक गृहितक आहे. वैज्ञानिकांपुढील यापुढचे आव्हान ‘मेसेन्टरी’चे नेमके कार्य शोधण्याचे आहे.

या संशोधनाचे महत्त्व आणि भावी दिशा विषद करताना प्रा. कॉफे म्हणतात : पोटाच्या कोणत्या ना कोणत्या विकाराशी ‘मेसेन्टरी’चा थेट संबंध असणार हे नक्की. आता आपण त्याचे शरीरातील स्थान व रचना नक्की केली आहे. त्याचे कार्य शोधणे हे पुढचे पाऊल आहे.
एकदा नेमके कार्य कळले की त्या कार्यातील बिघाडही ओघानेच कळेल. मग त्यातून या बिघाडामुळे होणाऱ्या आजाराचे ज्ञान होईल.
या सर्वांचा समुच्चय केला की ‘मेसेन्टेरिक सायन्स’चे एक नवे दालन अभ्यासासाठी खुले होईल.
 

 

Web Title: A new human body started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.