नवेल्या आईचा गोड सहारा.. वन मन्थ सीट ! चीनमधील पारंपरिक पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 06:33 AM2024-07-06T06:33:23+5:302024-07-06T06:33:45+5:30

काहींना ही पद्धत अगदीच नवखी वाटली. कोणाला ती अजिबात पटली नाही तर कोणाला ती फारच छान वाटली.

New mother sweet support.. One month seat! A traditional method in China | नवेल्या आईचा गोड सहारा.. वन मन्थ सीट ! चीनमधील पारंपरिक पद्धत

नवेल्या आईचा गोड सहारा.. वन मन्थ सीट ! चीनमधील पारंपरिक पद्धत

बाळ जन्माला आलं की आई झालेल्या स्त्रीला अपार आनंद होतो. दवाखान्यात असेपर्यंत सर्व ठीक वाटतं.  पण एकदा का बाळाला घेऊन घरी आलं की मात्र आई झालेली स्त्री घाबरते. त्यात घरी आई, सासू किंवा आणखी कोणी मोठं आणि जाणतं माणूस असेल तर ताण थोडा तरी हलका होतो; पण यातलं जर कोणीच मदतीला नसेल तर मात्र बाळाची आई गांगरून जाते. अशी परिस्थिती आल्यास काय करायचं, असा प्रश्न जगभरातल्या अनेक बायकांना पडतो तसाच तो अमेरिकन असलेल्या पण सध्या हाँगकाँगमध्ये राहणऱ्या अनास्तासिया क्राॅस हिलाही पडला. मात्र, तिला तिच्या या अडचणीत चीनमधील पारंपरिक पद्धतीने मदत केली. ‘चायनीज वन मन्थ सीट’ ही ती परंपरा.

अनास्तासिया कॉसचा जन्म अमेरिकेतील पेनिसिल्वानिया येथे झाला. मात्र, ती लहानाची मोठी झाली न्यूयाॅर्कमध्ये. गायक आणि लेखक ही तिची ओळख. २०१६ पासून अनास्तासिया आपल्या चीनी नवऱ्याबरोबर चीनमधील हाँगकाँग शहरात स्थायिक झाली. चीनमध्ये बोलली जाणारी भाषा तिला पहिल्यापासून आवडत असल्याने ती भाषा ती शिकली. भाषा शिकता शिकता चीनमधील संस्कृती तिला कळत गेली. हाँगकाँग आणि मेनलॅण्ड चायना या दोन शहरात तिचा वावर जास्त होता. अनास्तासिया चीनमधीला आपल्या अनुभवावर समाजमाध्यमावर कायम लिहायची, आपले अनुभव वर्णन करायची. ती कुठे राहते, काय करते यासारखे सगळे तपशील ती द्यायची. असाच एकदा तिने बाळांतपणानंतरच्या आपल्या अनुभवाबद्दल सांगितलं.

‘चायनीज वन मन्थ सीट’ या पद्धतीचा आपल्याला कसा फायदा झाला याचं वर्णन केलं. त्यावर तिला लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींना ही पद्धत अगदीच नवखी वाटली. कोणाला ती अजिबात पटली नाही तर कोणाला ती फारच छान वाटली. २०२१ मध्ये अनास्तासिया नवऱ्यासोबत हाँगकाँगला राहायला आली. त्याचदरम्यान तिला मातृत्वाची चाहूल लागली. नऊ महिने व्यवस्थित काळजी घेतल्याने तिचे बाळंतपण सुखरूप झाले. गोंडस मुलीला घेऊन ती घरी आली. मातृत्वाची चाहूल लागली त्यावेळीच बाळंतपणानंतर लगेचच घरी ‘महिनाभरासाठी पूर्णवेळ नर्स’ नेमण्याचा निर्णय दोघांनी घेतलेला होता. कारण बाळंतपणानंतर घरात दुसरं कोणीच मदतीला नसणार याचा अंदाज त्यांना होता. ओळखीच्यांची, नातेवाइकांची मदत घेणंही त्यांना परवडणारं नव्हतं. अनास्तासियाचा नवरा चीनचा असल्याने त्याला चीनमधील ‘वन मन्थ सीट’ ही परंपरा माहिती होती. त्याचे फायदेही त्याला माहिती होते. त्याने अनास्तासिया सोबत चर्चा करून बाळंतपणानंतरच्या मदतीसाठी हा पर्याय निवडला. अनास्तासियालाही तो पटला. त्याबद्दलची माहिती जमवायला तिने सुरुवात केली. ओळखीच्यांचे अनुभव जाणून घेतले. 

जसजशी ती या विषयाची माहिती घेत होती तसतसे तिला याचे फायदे जाणवू लागले. तिची उत्सुकता वाढू लागली, लगेचच नर्सचा शोध सुरू झाला. अनेकींच्या मुलाखती घेऊन झाल्या. हाँगकाँगमध्ये बाळंतपणानंतर नर्ससेवा देणाऱ्या अनेक एजन्सी कार्यरत आहेत. या नर्सेसना सखोल प्रशिक्षण दिलेले असते. त्यांच्याकडून मिळालेल्या पर्यायांपैकी एक नर्स निश्चित करण्यात आली. ती जेव्हा दवाखान्यातून बाळासोबत घरी आली तेव्हा काही तासांतच महिनाभराच्या मुक्कामासाठी नर्स त्यांच्या घरी आली. नर्सने अनास्तासियाला बाळाला पाजायचे कसे, घ्यायचे कसे, दूध अधिक येण्यासाठी काय करायचे या सगळ्या गोष्टी शिकविल्या, शिवाय तिने दररोजचा चहा, नाश्ता, स्वयंपाक, इतर घरकामं ही आघाडीही एकटीने सांभाळली. त्यामुळे अनास्तासियाला या काळात पूर्ण विश्रांती मिळाली.  तिला बाळाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविता आला. 
अनोळखी बाईसोबत आपण कसे राहणार? ही चिंता सुरुवातीला असलेल्या अनास्तासियाची नर्सशी चांगली गट्टी जमली. मग तिने नर्सची ही सेवा आणखी एक महिना वाढवून घेतली. या काळात नर्सने अनास्तासियाला बाळाची काळजी घेण्याबाबत बारीक बारीक गोष्टी समजावून सांगितल्या. तिला दिवसातून चार वेळा पौष्टिक आहार दिला, घरातल्या इतर जबाबदाऱ्या निभावल्या. 

नर्सची निवड करताना..
चायनीज वन मन्थ सीटसाठी नर्सची निवड करणं हा फार महत्त्वाचा भाग. मुलाखतीतून ज्या नर्सची निवड केली जाते तिला घरी बोलावून, तिच्यासोबत पुरेसा वेळ घालवून  व्यवस्थित ओळख करून घेतली जाते. बाळंतपणाची तारीख, आपल्या आवडीनिवडी, घरातल्या सोयीसुविधा याची माहिती बारकाईने दिली जाते. त्यामुळे नर्सला माणसांचा, घराचा, आपल्याला काय पद्धतीने काम करावं लागेल याचा अंदाज येतो.

Web Title: New mother sweet support.. One month seat! A traditional method in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.