डोनाल्ड ट्रम्प काढणार प्रवेशबंदीचा नवा आदेश!
By admin | Published: February 12, 2017 12:25 AM2017-02-12T00:25:35+5:302017-02-12T00:25:35+5:30
सात मुस्लीम बहुसंख्यांक देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यासाठी पुढील आठवड्यात नवे कार्यकारी आदेश काढण्याचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मनसुबा
वॉशिंग्टन : सात मुस्लीम बहुसंख्यांक देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यासाठी पुढील आठवड्यात नवे कार्यकारी आदेश काढण्याचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मनसुबा आहे. आधीच्या अशाच निर्णयाला अमेरिकी न्यायालयाने स्थगिती दिली असून ती उठविण्यासही नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नवे आदेश काढण्याचा निर्णय घेतला.
आम्ही ही लढाई जिंकू. दुर्देवी बाब ही आहे की, घटनात्मकद्दृष्ट्या याला वेळ लागेल; परंतु ही लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू. आमच्याकडे इतरही अनेक पर्याय असून एकदम नवा कार्यकारी आदेश आणण्याचाही त्यात समावेश आहे, असे ट्रम्प म्हणाले. अॅण्ड्र्यूज हवाई दल तळावरून फ्लोरिडाला जाताना एअर फोर्स वन विमानात ते पत्रकारांशी बोलत होते. नवा कार्यकारी आदेश आणण्याचा तुमचा विचार आहे का, असा प्रश्न विचारला असताना ट्रम्प म्हणाले की, होय. असे होऊ शकते. सुरक्षेसाठी आम्हाला तत्परतेने निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे असे होऊ शकते.
आपण नाईन्थ यूएस सर्किट कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या आदराखातर कोणत्याही निर्णयाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी एक आठवडा प्रतीक्षा करू. कदाचित सोमवार किंवा मंगळवारी नवे कार्यकारी आदेश काढले जातील. स्थलांतरशी संबंधित नव्या कार्यकारी आदेशात सुरक्षा उपाय अंतर्भूत असतील, असे ट्रम्प म्हणाले.
आमच्याकडे अत्यंत कडक तपासणी होते. मी याला सखोल चौकशी म्हणतो. आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत भक्कम होणार आहोत. चांगल्या कामासाठी येऊ इच्छिणाऱ्या लोकांनाच आमच्या देशात प्रवेश असेल. नाईन्थ यूएस सर्किट कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने सात मुस्लीमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयावरील स्थगिती उठविण्यास गुरुवारी नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली. सात प्रमुख मुस्लीम देशांचे लोक अमेरिकेचा दौरा करू शकतात, असा या निकालाचा अर्थ आहे. व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी काही गोष्टी अत्यंत तत्परतेने करणार आहोत. तुम्हाला हे पुढील आठवड्यात दिसेलच.
याशिवाय आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करण्यात कसूर करणार नाही. अखेरीस आमचाच विजय होईल यात थोडीही शंका नाही. आम्ही आमचा देश सुरक्षित ठेवणार आहोत. त्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व उपाय करू. मी देशाला सर्वोत्कृष्ठ सुरक्षा पुरवेन, असे मतदारांना वाटले. (वृत्तसंस्था)
खूप काही आत्मसात केले
न्यायालयाने दणका दिल्यानंतरही आपण अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत, असे संकेत ट्रम्प यांनी दिले. मी अलीकडेच राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. परंतु, मी खूप आत्मसात केले आहे. या त्या गोष्टी आहेत ज्या राष्ट्राध्यक्षपदावर असतानाच शिकता येऊ शकतात. देशावर मोठी संकटे घोंगावत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.