“एका आठवड्यात भारतीय सेनेला हुसकावून लावेन”; मालदीवच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची दर्पोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 02:46 PM2023-10-18T14:46:51+5:302023-10-18T14:47:05+5:30
Maldives Mohamed Muizzu: राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी भारतीय सैन्य परत पाठवणे सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Maldives Mohamed Muizzu: मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी एक मोठे विधान केले आहे. पदभार सांभाळण्यापूर्वी भारतीय सेनेला परत पाठवणे हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मुइझ्झू यांनी म्हटले आहे. एका आठवड्याभरात भारतीय सेनेला हुसकावून लावेन. तसे भारताला सांगितले जाईल, असे मुइझ्झू यांनी म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना मुइझ्झू म्हणाले की, राजनैतिक पद्धतीने हा मुद्दा सोडवला जाईल. शक्य झाले तर राष्ट्राध्यक्ष पद हाती घेण्यापूर्वीच्या आठवड्याभरातच भारतीय सेनेला परत पाठवले जाईल. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे मुइझ्झू यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुइझ्झू हे चीन समर्थक मानले जातात. त्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांना पराभूत केले होते. इब्राहिम सोलिह हे भारताच्या बाजूने होते. आता महिनाभरात मुइझ्झू राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
शतकानुशतके शांतताप्रिय देश
काही दिवसांपूर्वी भारतीय उच्चायुक्तांना भेटलो होतो. त्या भेटीतच म्हणालो होतो की, या समस्येला आमचे सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यांनी याचा सकारात्मक विचार केला. यावर मुद्द्यावर पुढे जाण्यासाठी सोबत काम करू असे आश्वासन दिले, असे मुइझ्झू यांनी म्हटले आहे. आमचा देश शतकानुशतके शांतताप्रिय आहे. आमच्या भूमीवर परकीय सैन्य कधीच नव्हते. आमच्याकडे कोणतीही मोठी लष्करी पायाभूत सुविधा नाही. मात्र, आमच्या भूमीवर कोणत्याही परदेशी सैन्याच्या उपस्थितीने आम्हाला सुरक्षित वाटत नाही, असे मुइझ्झू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यापुढे मालदीवचे परराष्ट्र धोरण चीनकडे झुकणार का? मुइझू म्हणाले की, ते मालदीव समर्थक धोरणाचे पालन करतील. आम्ही कोणत्याही देशाला खूश करण्यासाठी समर्थन वा पाठिंबा देणार नाही. आमचे हित आधी जपले जावे अशी आमची इच्छा आहे. जो देश त्याचा आदर करतो तो आमचा चांगला मित्र असेल, असे मुइझ्झू यांनी म्हटले आहे.