शरणार्थींच्या प्रश्नावर नवा प्रस्ताव
By admin | Published: September 10, 2015 03:25 AM2015-09-10T03:25:59+5:302015-09-10T03:25:59+5:30
सीरियन शरणार्थींचे वाटप युरोपात कसे करायचे, याबाबत सध्या विचार सुरू आहे. त्यासाठी युरोपियन पार्लमेंटसमोर युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन क्लाऊड जंकर यांनी नवा प्रस्ताव मांडला आहे.
ब्रुसेल्स : सीरियन शरणार्थींचे वाटप युरोपात कसे करायचे, याबाबत सध्या विचार सुरू आहे. त्यासाठी युरोपियन पार्लमेंटसमोर युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन क्लाऊड जंकर यांनी नवा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार १,६०,००० लोकांची युरोपातील विविध देशांत विभागणी करण्याचा त्यांचा विचार आहे. दरम्यान, या वर्षभरामध्ये ८,५०,००० व्यक्ती भूमध्य समुद्र ओलांडून युरोपात येण्याची शक्यता संयुक्त राष्ट्राच्या यूएनएचसीआरने म्हटले आहे.
युरोपियन पार्लमेंटसमोर बोलताना जीन क्लाऊड म्हणाले, की आताची वेळ ही एकमेकांमध्ये भांडत बसण्याची नाही. लवकरात लवकर योग्य प्रकारे या स्थलांतरित लोकांची विभागणी युरोपात होणे आवश्यक आहे. त्यांनी दुशरणार्थींच्या समस्येवर एक कायम पद्धतीचा अवलंब करण्याचे सुचित केले आहे. स्थलांतरासाठी कायदेशीर प्रक्रिया तसेच सीमांचे व्यवस्थापन करण्याच्या मुद्द्याचाही त्याने समावेश केला आहे. युरोपातील स्थलांतरित व निर्वासितांसाठी सुरक्षित देशांची यादीही तयार करण्याची गरज त्यांनी मांडली आहे. युरोपमध्ये आपण सर्वच एका अर्थाने शरणार्थीच होतो, त्यामुळे शरणार्थींना आश्रय देण्याचे महत्त्व आपल्याला माहीत असले पाहिजे, अशा शब्दांमध्ये एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न जंकर यांनी या वेळेस केला. त्यांच्या भाषणाच्यादरम्यान एका इटालियन सदस्याने अॅँजेला मर्केल यांचा मुखवटा खालून व्यत्ययही आणला.
भेदभाव नको
आपल्या भाषणामध्ये जंकर यांनी युरोपीय देशांना स्थलांतरितांच्या प्रश्नाच्या बाबतीत धार्मिक आधारावर भेदभाव करू नका, असा स्पष्ट सल्ला दिला आहे. स्थलांतरितांच्या बाबतीत कोणताही धर्म, कोणत्याही श्रद्धेच्या गोष्टी किंवा तत्त्वज्ञानाचा संबंध नाही; त्यामुळे येथे भेदभाव करू नका, असेही ते म्हणाले.
लाथ मारणारीची नोकरी गेली
सीरियन स्थलांतरितांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या हंगेरीवर यापूर्वीच जगभरातून टीका झाली आहे. त्यातच काल
एका महिला व्हिडीओग्राफरच्या कृत्यामुळे भर पडली आहे. हातात मूल असणाऱ्या एका सीरियन
व्यक्तीस लाथ मारताना त्या महिलेचे चित्र जगभरात प्रसिद्ध झाले.
त्यामुळे ती व्यक्ती कोसळली व हातातील मूलही गवतामध्ये पडले. याचा व्हिडीओ आणि फोटो फेसबुकवर प्रसिद्ध झाल्यावर तिच्यावर जगभरातून जबरदस्त टीका झाली. अखेर तिला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
ब्रुसेल्सकडे लक्ष...
१४ सप्टेंबर रोजी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे युरोपातील देशांच्या गृहमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीत आपला प्रस्ताव स्वीकारला जावा, अशी अपेक्षा जंकर यांनी व्यक्त केली आहे.
आॅस्ट्रेलिया सरसावला
सीरियातील शरणार्थींना
आसरा देण्यासाठी आॅस्ट्रेलियाने आपला हात पुढे केला आहे. यापूर्वी न्यूझीलंडनेही
750
व्यक्तींना सामावून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
आता आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी आणखी
12
हजार स्थलांतरितांना आश्रय देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्याचप्रमाणे स्थलांतरितांना अन्न व पांघरुणाच्या रूपाने
44
दशलक्ष डॉलर्सची मदतही जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे सीरियावर हवाई हल्ले करण्यासाठी अमेरिकेने मदत मागितली तर त्या हल्ल्यांत सामील होऊ, असेही अॅबॉट यांनी स्पष्ट केले आहे.