Facebook युझर्सवर नवा अंकुश, नामवंतांवरील टीका रोखण्यासाठी संरक्षक उपाय; दहा संस्था काळ्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 09:33 AM2021-10-15T09:33:53+5:302021-10-15T09:36:35+5:30
New restrictions on Facebook users: फेसबुकवर नामवंत लोक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर होणारी गलिच्छ टीका रोखण्यासाठी फेसबुकने नवे संरक्षक उपाय जाहीर केले आहेत.
नवी दिल्ली : फेसबुकवर नामवंत लोक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर होणारी गलिच्छ टीका रोखण्यासाठी फेसबुकने नवे संरक्षक उपाय जाहीर केले आहेत. त्यानुसार या व्यक्तींची आक्षेपार्ह स्वरूपातील छायाचित्रे टीकाकारांनी झळकविली किंवा वैयक्तिक आयुष्यावर शिंतोडे उडविणारा मजकूर लिहिला तर तो लगेच काढून टाकला जाणार आहे. फेसबुकने भारताशी संबंधित दहा संस्थांना काळ्या यादीत टाकले असून, त्यामध्ये सनातन संस्थेचा समावेश आहे.
जी अकाउंट नियमानुसार संचालित होत नाहीत, ती बंद करण्यात येणार आहेत, असे फेसबुकने म्हटले आहे. लोकांच्या सुरक्षेपेक्षा फेसबुक नफा कमाविण्याला जास्त प्राधान्य देते, असा आरोप या कंपनीच्या माजी कर्मचारी फ्रान्सिस हेगन यांनी केला होता. फ्रान्सिस हेगन यांनी फेसबुकच्या धोरणांसंदर्भातील काही कागदपत्रे उघड केल्याने ही कंपनी अडचणीत आली होती.
काळ्या यादीत ‘सनातन’ही...
फेसबुकने सुमारे चार हजार व्यक्ती व संस्थांना काळ्या यादीत टाकले आहे.त्यात सनातन संस्थेसह दहा भारतीय संस्थांचा समावेश आहे. याशिवाय माओवादी कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड, ऑल त्रिपुरा टायगर फोर्स, कांगलेई कम्युनिस्ट पार्टी, खलिस्तान टायगर फोर्स, पीपल्स रेव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलेईपाक, इंडियन मुजाहिदीन यांचाही यादीत समावेश आहे. अतिरेकी अफजल गुरू, तालिबान व इस्लामिक स्टेट हेही या यादीत आहेत.
कायदेशीर कारवाईऐवजी नवे उपाय
आता फेसबुक काय निर्णय घेणार, याची सर्वांना उत्सुकता होती. हेगन यांच्या आरोपांना फेसबुक जाहीर उत्तर देणार की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार याकडेही लक्ष होते. मात्र त्या गोष्टी टाळून फेसबुकने नामवंतांवरील गलिच्छ टीका रोखण्यासाठी नवे उपाय जाहीर करण्यावर भर दिला.
विविध व्यक्तींची बदनामी करण्यासाठी काही लिंक फेसबुकवर पोस्ट केल्या जातात. इतर सोशल मीडियावरील लिंकही देण्यात येतात. अशा लिंक आता फेसबुकवरून काढून टाकण्यात येणार आहेत.
कोणाही व्यक्तीची फेसबुकवर बदनामी किंवा छळ होऊ नये याची आम्ही दक्षता घेणार आहोत. एखाद्या हिंसक घटनेचा तडाखा बसलेले लोक, सरकारी अधिकारी यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी, त्यांची बदनामी करण्यासाठी टीकाकार फेसबुकवरील एकाहून जास्त अकाउंटचा वापर करतात. अशी अकाउंट यापुढे बंद केली जाणार आहेत.
- अँटिगोन डेव्हिस,
सुरक्षाविभाग प्रमुख, फेसबुक