नेपाळमध्ये नवीन धर्मनिरपेक्ष घटना लागू
By admin | Published: September 20, 2015 10:33 PM2015-09-20T22:33:42+5:302015-09-20T22:36:16+5:30
सुमारे सात वर्षे चाललेले चर्चेचे गुऱ्हाळ, देशातील तणाव, हिंसक निदर्शने या वातावरणातच रविवारी नेपाळने ऐतिहासिक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी घटना मंजूर केली.
काठमांडू : सुमारे सात वर्षे चाललेले चर्चेचे गुऱ्हाळ, देशातील तणाव, हिंसक निदर्शने या वातावरणातच रविवारी नेपाळने ऐतिहासिक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी घटना मंजूर केली. या नवीन घटनेनुसार नेपाळमध्ये सात संघराज्ये अस्तित्वात आली आहेत. या नवीन घटनेच्या विरोधात अल्पसंख्याक मधेशी गटांनी हिंसक आंदोलन चालविले होते.
या नवीन घटनेतील तरतुदी अध्यक्ष राम बरन यादव यांनी संसदेत जाहीर केल्या. संविधान सभेने मंजूर केलेली आणि संविधान सभेच्या अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलेली नवीन घटना २० सप्टेंबर २०१५ पासूनच लागू झाल्याची घोषणा मी करीत आहे, असे अध्यक्ष राम बरन यादव यांनी जाहीर केले.
ते म्हणाले की, या ऐतिहासिक क्षणी सर्वांच्या ऐक्याचे आणि सहकार्याचे आवाहन मी करतो. नया बानेश्वर स्थित संसद भवनात त्यांनी ही घोषणा केली. त्यावेळी भारताच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातील मधेशी समर्थक किरकोळ हिंसाचार करीत होते.
एका हिंदू राष्ट्रातून धर्मनिरपेक्ष राष्ट्रात नेपाळचे परिवर्तन होत असताना हजारो नेपाळी नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी नेपाळचा राष्ट्रीय ध्वज उंचावत आनंदोत्सव साजरा केला. संसद भवनासमोरही मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. यानिमित्ताने काठमांडूच्या विविध भागांत मिरवणुका काढण्यात आल्या. अनेकांनी रस्त्याची सजावट आणि घरांवर रोषणाई केली.
राम बरन यादव म्हणाले की, ही घटना म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची हमी देणारा दस्तऐवज आहे. त्यातून सार्वभौम नेपाळ अस्तित्वात आले आहे. या नवीन घटनेने नेपाळ हे पूर्णपणे लोकशाही राष्ट्र बनले आहे. या नवीन घटनेने देशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित होईल, असा मला विश्वास वाटतो. त्यातून देशाची आर्थिक प्रगती होऊन सुबत्ता येईल. कायमस्वरूपी शांततेसाठी जनतेने गेल्या सात दशकांपासून लढा दिला होता. या नवीन घटनेने त्यांना ऐक्य राखण्यास मदत केली आहे. देशात सात प्रांत निर्माण होत असल्याचा निषेध हिंसक स्वरूपात गेल्या महिन्यात झाला असून, त्यात किमान ४० जण ठार झाले.