भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 01:34 PM2021-08-31T13:34:09+5:302021-08-31T13:34:32+5:30
अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासाठी संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. कारण तालिबान्यांकडून अफगाणिस्तानात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना आश्रय दिला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे.
अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासाठी संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. कारण तालिबान्यांकडूनअफगाणिस्तानातदहशतवादी कारवाया करणाऱ्यांना आश्रय दिला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे. आता हिच भीती खरी ठरताना दिसत आहे. कारण एका गुप्तचर अहवालानुसार अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचं एक नवं नेटवर्क अस्तित्वात आणलं जात आहे. याच नाव 'तहरीक-ए-तालिबान अमिरात' असं ठेवण्यात आलं आहे. पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबा आणि हक्कानी नेटवर्कनं एकत्र येत या नव्या संघटनेची स्थापना केल्याची माहिती समोर आली आहे.
जैश-ए-मोहम्मद संघटना सर्वात ताकदवान दहशतवादी संघटना म्हणून गेल्या काही काळापासून पुढे आली आहे. यातच जैशचा म्होरक्या मसूद अजहर आणि मोहम्मद इब्राहिम अजहर यांना अफगाणिस्तानातील ऑपरेशनसाठी समन्वय राखण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात ट्रेनिंग देण्याचा जैशचा मनसुबा आहे. यातून ट्रेनिंग घेतलेले दहशतवादी तालिबानच्या नव्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मदत करतील. जैश-ए-मोहम्मदच्या अनेक कुख्यात दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातील ऑपरेशनसाठी पाठविण्यात आलं आहे याचीही माहिती मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
हक्कानी नेटवर्कला तालिबानमध्ये मिळणार आश्रय
हक्कानी नेटवर्कचे इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच हक्कानी नेटवर्कमुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे आणि यात हक्कानी नेटवर्कला देखील स्थान मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हक्कानी नेटवर्कनं आजवर अनेक आत्मघाती हल्ले केले आहेत. यात सामान्य नागरिकांसह परदेशी नागरिक आणि सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हक्कानी नेटवर्कचे पाकिस्तानच्या आयएसआयशी देखील संबंध आहेत. त्यामुळे भारतासाठी ही चिंतेची बाब म्हटली जात आहे.
पाकिस्तानचे दहशतवादी अफगाणिस्तानात घेतील ट्रेनिंग
तालिबानचं पुनरागमन भारतासह आणि काही देशांसाठी डोकेदुखी ठरू शकतं याचा अंदाज याआधीच आला होता. पाकिस्तानचे तालिबान्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारत विरोधी कारवायांमध्ये तालिबान पाकिस्तानला मदत करू शकतं. पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेणारे दहशतवादी आता अफगाणिस्तानात जाऊन बिनधास्तपणे ट्रेनिंग सुरू करतील आणि त्याची व्याप्ती देखील वाढेल असा धोका व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात तालिबानकडून अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ देणार नाही अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा देखील मोठा प्रश्न आहे.