CoronaVirus Omicron: जगाला हादरविणारे नवे 'वुहान'; 90 टक्के कोरोनाबाधित ओमायक्रॉनने संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 02:52 PM2021-11-29T14:52:29+5:302021-11-29T14:53:00+5:30
Corona New Variant Omicron: गजबजलेला हा परिसर सोन्याची भूमी म्हणून ओळखला जातो. त्याची सीमा इतर कोणत्याही देशाला जोडलेली नाही. परंतु सोन्याच्या खाणी आणि व्यवसायाच्या संदर्भात परदेशी लोकांची सतत ये-जा असते.
जवळपास दोन वर्षांपूर्वी चीनच्या वुहानने अवघ्या जगाला हादरा दिला होता. कोरोना व्हायरसची उत्पत्ती करून जगाला लॉकडाऊनमध्ये टाकले होते. लाखो लोकांचे जीव गेले, करोडोंना श्वासासाठी तडफडावे लागले. अब्जावधी रुपये उपचारावर वाया गेले. आजही जग या महामारीशी लढत आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोना रुग्ण कमी होऊ लागले होते, तोच नवा व्हेरिअंट येऊन धडकल्याने ओमायक्रॉन भीतीचा नवा अध्याय सुरु केला आहे. डझनावर देशांमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण आढळू लागले आहेत.
जगाला सावध करणारा दक्षिण आफ्रिका बदनाम होत असला तरी असा एक प्रांच आहे जो वुहान बनण्याच्या वाटेवर आहे. जवळपास ओमायक्रॉनने बाधित असलेले 90 टक्के रुग्ण हे या एका प्रांतातील आहेत. हा प्रांत आहे गौतेंग (Gauteng). या प्रांतात सर्वत्र लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे. विद्यापीठे, कॉलेज बंद करण्यात आली आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रत्येकाची टेस्टिंग केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील ही परिस्थिती पाहून जगातील बहुतांश देशांनी तेथून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर नियम लावले आहेत, काहींनी विमानोड्डाणेच बंद केली आहेत.
दक्षिण आफ्रिकेमध्ये 18 ते 34 वयोगटातील केवळ 22 टक्के तरुणांनी कोरोनाची लस घेतली आहे. लस घेतलेल्या मनकुबा जिठा या विद्यार्थ्याने सांगितले की, तो अनेक सहकाऱ्यांना लस घेण्यास प्रवृत्त करत आहे. जीथा म्हणाला की, मी त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे की जर कोरोना व्हायरस टाळायचा असेल तर लस घ्यावीच लागेल. आपण टीव्हीवर पाहतो की लोक रोज मरत आहेत. आपण समजून घेतले पाहिजे.
गौतेंग प्रांत कोठे आहे?
गौतेंग हा दक्षिण आफ्रिकेतील ९ प्रांतांपैकी एक आहे. येथील लोकसंख्या सुमारे दीड कोटी आहे. गजबजलेला हा परिसर सोन्याची भूमी म्हणून ओळखला जातो. त्याची सीमा इतर कोणत्याही देशाला जोडलेली नाही. परंतु सोन्याच्या खाणी आणि व्यवसायाच्या संदर्भात परदेशी लोकांची सतत ये-जा असते. कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्यानंतर प्रांतातील सर्व भागात चाचणी आणि लसीकरणाचे काम तीव्र करण्यात आले आहे.