New York State Buffalo Shooting: न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 कृष्णवर्णीयांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 09:16 AM2022-05-15T09:16:17+5:302022-05-15T09:16:25+5:30
New York State Buffalo Shooting: या घटनेनंतर 18 वर्षीय हल्लेखोराने पोलिसासमोर आत्मसमर्पण केले आहे.
न्यू यॉर्क: न्यूयॉर्कमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बफेलोच्या एका सुपरमार्केटमध्ये शनिवारी दुपारी 13-14 जणांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी हल्लेखोर व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
कृष्णवर्णीयांवर हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोराने घटना ऑनलाइन दाखवली. सध्या पोलिसांनी या 18 वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, ज्या भागात ही गोळीबाराची घटना घडली त्या भागात बहुतांश कृष्णवर्णीय राहतात. बळी पडलेले बहुतांश लोक कृष्णवर्णीय आहेत. बफेलोचे पोलिस आयुक्त ग्रामाग्लिया यांनी सांगितले की 13 जणांना गोळ्या लागल्या, त्यापैकी 10 जण मरण पावले. बाकीच्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्यानंतर आत्मसमर्पण
या घटनेत सुपरमार्केटमध्ये काम करणारे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने संशयितावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. पोलिसांनी सांगितले की, संशयिताकडे शक्तिशाली रायफल होती आणि त्याने हेल्मेटही घातले होते. हल्ल्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.