न्यूयॉर्क दहशतवादी हल्ल्यापुर्वी 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता हल्लेखोर, ISIS सोबत निष्ठा राखण्याची घेतली होती शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 10:50 AM2017-11-01T10:50:53+5:302017-11-01T10:53:15+5:30
प्रत्यक्षदर्शींनी न्यूयॉर्क पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापुर्वी हल्लेखोर जोरजोराने 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता. या हल्ल्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
न्यूयॉर्क - अमेरिकेतील मॅनहॅटन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख 29 वर्षीय सैफुलो म्हणून झाली आहे. हल्ल्यानंतर सैफुलोने ट्रकजवळ एक कागद ठेवला होता, ज्यामध्ये त्याने इसिससोबत असलेली आपली निष्ठा जाहीर केली आहे. ट्रकजवळ सापडलेल्या या कागदामुळे सैफुला इसिसचा दहशतवादी असल्याचा संशय बळावला आहे. प्रत्यक्षदर्शींनी न्यूयॉर्क पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापुर्वी हल्लेखोर जोरजोराने 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता. या हल्ल्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एफबीआयकडे हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मॅनहॅटन शहरात मंगळवारी दुपारी एका ट्रक चालकाने पादचा-यांना चिरडले आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहटन शहरातील हडसन नदीच्या किना-यावर दुचाकी स्वारांसाठी रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्यावरील पादचा-यांना एका ट्रक चालकाने भरधाव वेगात चिरडले. या घटनेमुळे धावपळ उडाली असता येथील एका गाडीतून गोळीबार सुद्धा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 9/11 स्मारकाजवळदेखील गोळीबार झाला, मात्र यामध्ये जिवीतहानी झाल्याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील हल्ला हा आजारी आणि माथेफिरू व्यक्तीकडून करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच, इसिस या दहशतवादी संघटनेला अमेरिकेत येऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला आहे. 'आता बस झालं, आखाती देश आणि इतरत्र आयसिसला नामोहरम केल्यानंतर त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही'', असं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
We must not allow ISIS to return, or enter, our country after defeating them in the Middle East and elsewhere. Enough!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 31, 2017
My thoughts, condolences and prayers to the victims and families of the New York City terrorist attack. God and your country are with you!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 31, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही न्यूयॉर्कमधील हल्ल्याचा निषेध केला. मृतांच्या परिवाराच्या आणि जखमींच्या दु:खात मी सहभागी आहे, असं ट्वीट मोदींनी केलं आहे.
Strongly condemn the terror attack in New York City. My thoughts are with the families of the deceased & prayers with those injured.
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2017