कोरोनामुक्त झालेल्या देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, परदेशातून आलेले प्रवासी 'पॉझिटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:31 PM2020-06-16T12:31:15+5:302020-06-16T12:32:31+5:30
मागील आठवड्यात न्यूझीलंड देशानं कोरोनामुक्त झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.
कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान माजवलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 81 लाख 18,671 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 39,198 जणांना प्राण गमवावे लागले, तर 42 लाख 16,325 रुग्ण बरे झाले आहेत. असे असताना मागील आठवड्यात न्यूझीलंड देशानं कोरोनामुक्त झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली. त्यामुळे जगभरातून न्यूझीलंड प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले गेले. पण, आता न्यूझीलंड कोरोनामुक्त राहिलेला नाही. परदेशातून आलेले दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे 24 दिवसांनंतर न्यूझीलंडमध्ये कोरोनाची दोन रुग्ण सापडली आहेत आणि त्यांच्या संपर्कात येऊन आणखी किती जणांना कोरोना झाला असेल, याचा तपास तातडीनं सुरू करण्यात आला आहे.
ब्रिटन येथून आलेले दोन प्रवासी कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील आठवड्यात न्यूझीलंडनं लॉकडाऊन उठवला होता. या संकटावर मात करणारा न्यूझीलंड हा पहिला देश ठरला होता. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी दोन रुग्ण सापडल्याची माहिती दिली. लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेले न्यूझीलंडचे रहिवाशी आता परतीच्या वाटेवर आहेत आणि त्यामुळे पुन्हा देशात कोरोनारुग्ण वाढण्याची भीतीही आर्डेन यांनी व्यक्त केली. दोन नवीन रुग्णांमध्ये 30 व 40 वर्षीय महिलांचा समावेश आहे. पालकांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या दोघी वेलिंग्टन येथे आल्या होत्या.
7 जूनला दोघी लंडन व्हाया दोहा आणि ब्रिस्बन वेलिंग्टन येथे दाखल झाल्या होत्या. या दोघींना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील आता कोरोना रुग्णांची संख्या 1506 झाली असून त्यापैकी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पालकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावण्यासाठी दोघींना परवानगी देण्यात आली होती. अंत्यसंस्काराच्या वेळी ते अनेकांना भेटले होते आणि त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध सुरू झाला आहे.
Well Done; CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करन यांना इरफान पठाणची आर्थिक मदत!
मोठी अपडेट; IPL 2020चा मार्ग मोकळा, BCCI साठी गुड न्यूज?