न्यूझीलंड 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरला, सुनामीचा इशारा
By Admin | Published: November 13, 2016 08:51 PM2016-11-13T20:51:13+5:302016-11-13T20:53:05+5:30
न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चजवळच्या भूभागाला 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे.
ऑनलाइन लोकमत
वेलिंग्टन, दि. 13 - न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चजवळच्या भूभागाला 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. मात्र या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपानंतर न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिकेच्या जिऑलॉजी सर्व्हेनुसार, न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चपासून 91 किलोमीटर उत्तर पूर्वेत स्थानिक वेळेनुसार रात्री 11.02 वाजताच्या सुमारास 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ख्राइस्टचर्च हे न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील सर्वात मोठं शहर आहे. याआधी फेब्रुवारी 2011मध्ये आलेल्या 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवितहानीसह वित्तहानी झाली होती. त्यावेळी जवळपास 185 लोकांचा मृत्यू झाला होता. ख्राइस्टचर्चच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं फेसबुक पोस्टमधून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आम्ही याबाबत माहिती घेत आहोत. लवकरच याबाबत सविस्तर माहिती देऊ, आता भूकंपामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
भूकंपानंतरही छोटे छोटे हादरे बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असंही ख्राइस्टचर्चच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं सांगितलं आहे. या भूकंपाबाबत एका स्थानिकानं सांगितलं की, "आम्ही झोपेत असताना पूर्ण घर हलण्याचा आवाज येऊ लागला. त्यावेळी आमचे डोळे उघडले. तरीही भूकंपाचे सौम्य झटके जाणवत होते." भूकंपाचे केंद्रबिंदूजवळील शहर आणि गावात मोठ्या प्रमाणात वित्तहानी होऊ शकते, अशी शक्यताही ख्राइस्टचर्चच्या आपत्कालीन विभागानं वर्तवली आहे.
#UPDATE 'Destructive' tsunami warning follows massive 7.8-magnitude NZ quake - latest https://t.co/EnYxEVXmh2#NZquakepic.twitter.com/X878bXiHQE
— AFP news agency (@AFP) November 13, 2016