नवजात अर्भकाच्या डोळ्याला व तोंडाला पट्या बांधल्या
By admin | Published: May 13, 2014 07:00 PM2014-05-13T19:00:43+5:302014-05-14T03:19:05+5:30
फिलिपाईन्समधील नवजात बाळ खूपच आवाज करत असल्याने त्याच्या तोंडाला व डोळ्याला चिकटपट्ट्या लावल्याचा प्रकार घडला असून, या बाळाची छायाचित्रे फेसबुक व टिष्ट्वटरवर प्रसिद्ध झाले.
मनिला - फिलिपाईन्समधील एका रुग्णालयात नवजात बाळ खूपच आवाज करत असल्याने त्याच्या तोंडाला व डोळ्याला चिकटपट्ट्या लावल्याचा प्रकार घडला असून, या बाळाची छायाचित्रे फेसबुक व टिष्ट्वटरवर प्रसिद्ध झाल्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मुलाची देखभाल करणार्या नर्सने मूल फारच आवाज करते असे सांगितले, असा दावा मुलाच्या पित्याने केला आहे. सेबू प्युरीकल्चरल सेंटर अँड मॅटर्निटी होम असे या रुग्णालयाचे नाव असून, तिथे घडलेल्या या प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे. रियान नोव्हल असे पित्याचे नाव असून, जस्मिन बोडॉकडॉक असे आईचे नाव आहे. त्यांच्या पाच दिवसांच्या मुलाला नर्सरीत पाठवले असता, त्याच्या डोळ्याला व तोंडाला चिकटपट्ट्या लावल्याचे आढळले, अशी त्यांची तक्रार आहे. मूल फारच आवाज करत असल्याने मी त्याचे तोंड बंद केले, असे तेथील नर्सने सांगितले. योहान्स नोव्हल असे मुलाचे नाव असून, त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल तो बोलू शकत नाही, म्हणून आम्ही त्याच्यावतीने बोलत आहोत, असे नोव्हलने फेसबुकवर लिहिले आहे. ९ मे रोजी हे छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध झाले, तेव्हापासून फिलिपाईन्समध्ये गदारोळ उठला आहे. मुलाचे तोंड चिकटपट्टी लावून बंद करणार्या नर्सला तुरुंगात टाका, असे मेलनी मॅन्रॉय नावाच्या महिलेने टिष्ट्वटरवर लिहिले आहे.