नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 08:33 AM2023-04-02T08:33:43+5:302023-04-02T08:33:57+5:30
दोन आठवड्यांपूर्वी नेपाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
काठमांडू : नेपाळचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना काठमांडूच्या महाराजगंज येथील त्रिभुवन विद्यापीठाच्या अध्यापन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी पोटदुखीची तक्रार केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले."शनिवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत," असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन आठवड्यांपूर्वी नेपाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. नेपाळच्या निवडणूक आयोगानुसार, रामचंद्र पौडेल यांना 33,802 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुभाष चंद्र नेम्बवांग यांना 15,518 मते मिळाली.
याचबरोबर, नेपाळच्या निवडणूक आयोगानुसार, फेडरल संसदेच्या 313 सदस्यांनी मतदानात भाग घेतला, तर प्रांतीय विधानसभेच्या 518 सदस्यांनी राष्ट्रपती निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला.
काठमांडूच्या न्यू बनेश्वर येथील नेपाळच्या संसद भवनात हे मतदान झाले. नेपाळमधील निवडणूक आयोगाने सभागृहात संघीय संसद सदस्य आणि प्रांतीय विधानसभा सदस्यांसाठी दोन स्वतंत्र मतदान केंद्रे स्थापन केली होती. निवडणुकीसाठी सर्व प्रांतातील आमदार काठमांडूला पोहोचले होते.