न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:15 IST2025-04-24T19:14:24+5:302025-04-24T19:15:41+5:30
Istanbul Earthquake Viral Video: आशिया आणि युरोपच्या सीमेवर वसलेल्या तुर्कस्तानमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती

न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
तुर्कीतील सर्वात मोठे शहर बस्तांबदली येथे बुधवारी ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु, एका टीव्ही अँकरच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेजाऱ्याच्या घरातून मोठा आवाज आला तरी लोक काय झाले? हे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. परंतु, या टीव्ही अँकरने आपले काम सुरूच ठेवले. नेटकरी टीव्ही अँकर मेल्टेम बोजबेयोग्लू यांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
आशिया आणि युरोपच्या सीमेवर वसलेल्या तुर्कस्तानमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती. परंतु, तरीही टीव्ही अँकर मेल्टेम बोजबेयोग्लू यांनी चर्चा सुरूच ठेवली. व्हिडिओत पाहिले जात आहे की, भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण स्डुडीओ हादरला. पण मेल्टेम बोजबेयोग्लू घाबरल्या नाहीत. 'नुकताच खूप मोठा भूकंप झाला आहे. इस्तंबूलमध्ये खूप तीव्र भूकंपाचा धक्का जाणवत आहे', असे मेल्टेम बोजबेयोग्लू बोलत आहेत. त्या बोलताना त्यांच्या आवाजात भिती जाणवत आहेत, पण त्या न घाबरता परिस्थिती हाताळतात.
हा व्हायरल व्हिडिओ @nexta_tv नावाच्या हँडलवरून एक्सवर देखील शेअर करण्यात आला. टीव्ही अँकरचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी टीव्ही अँकरच्या धाडसाचे कौतूक करत आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'लाइव्ह शोदरम्यान भूकंपाचे धक्के जाणवत असतानाही टीव्ही अँकर घाबरली. तिच्या धाडसाचे कौतूक. या घटनेमुळे तुर्कीमध्ये भूकंपाचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे, जिथे शास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून मोठ्या भूकंपाचा इशारा देत आहेत.'