मोदींच्या फोटोवाली ती बातमी बनावट, 'द न्यूयॉर्क टाइम्स'कडून स्पष्टपणे खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:20 AM2021-09-29T10:20:11+5:302021-09-29T10:22:50+5:30
न्यूयॉर्क टाइम्स कम्युनिकेशनने याबाबत ट्विटरवरुन खुलासा केला आहे. त्यानुसार, ही इमेज पूर्णपणे बनावट आहे, पंतप्रधान मोदींसह प्रचलित असलेल्या अनेकांपैकी ही एक आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीअमेरिका दौरा केल्यानंतर ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने त्यांची स्तुती केली. ‘Last, Best Hope of The Earth’ म्हणजेच ‘पृथ्वी तलावावरील सर्वात शेवटची आणि सर्वोत्तम आशादायी व्यक्ती’ अशा आशयाच्या मथळ्यासह पहिल्या पानावर मोदींच्या फोटोसह बातमी छापल्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या, तर अनेकांनी याच्या खोलात जाऊन ही बातमी फेक असल्याचे निदर्शनास आणून दिले. आता, द न्यूयॉर्क टाइम्सनेही याबाबत खुलासा केला आहे.
न्यूयॉर्क टाइम्स कम्युनिकेशनने याबाबत ट्विटरवरुन खुलासा केला आहे. त्यानुसार, ही इमेज पूर्णपणे बनावट आहे, पंतप्रधान मोदींसह प्रचलित असलेल्या अनेकांपैकी ही एक आहे. मोदींसंदर्भाती आमच्या सत्य व तथ्य बातम्या येथे पाहायला मिळतील, असे म्हणत टाइम्स कम्युनिकेशनने एक लिंकही शेअर केली आहे.
अखेर मोदींचा तो ‘शेवटची आशा’ म्हणविणारा व्हायरल फोटो खोटा असल्याचा @NYTimesPR कडून खुलासा #NarendraModihttps://t.co/uyogr3XuvI
— Shrimant Mane (@ShrimantManey) September 29, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह द न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावरील हा मथळा सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. ट्विटरवरही अनेकांना याबाबत आपले मत व्यक्त केलं. व्हॉट्सऍपवरही हीच इमेज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून आले. मात्र, या इमेजमधील तारखेचा घोळ सर्वांनाच अचंबित करणारा होता. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ आणि त्याखाली तारीख पुसट दिसत होती, तसेच ही जागा एडिटेड वाटत होती. तर, सप्टेंबर महिन्याचे स्पेलिंगही चुकीचे लिहिण्यात आले होते. September ऐवजी Setpember असे हे स्पेलिंग दिसत होते. त्यामुळे, ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, आता स्वत: द न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत ट्विटरवरुन खुलासा केला आहे.