येत्या सात वर्षांत लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला टाकेल मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 09:57 PM2017-06-22T21:57:25+5:302017-06-22T21:57:25+5:30
येत्या सात वर्षांत म्हणजे २०२४ च्या सुमारास लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल
Next
ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्रे, दि. 22 - येत्या सात वर्षांत म्हणजे 2024च्या सुमारास लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने वर्तविला आहे. या अंदाजानुसार सन 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.5 अब्ज एवढी होईल.
संयुक्त राष्ट्र संघाचा आर्थिक आणि सामाजिक बाबींविषयीचा विभाग जागतिक लोकसंख्येतील बदलाचा सुधारित अंदाज प्रसिद्ध करत असते. यंदा 25वा सुधारित अंदाज प्रसिद्ध केला. याआधी 2015 मधील अंदाजानुसार 2022 मध्ये भारताची लोकसंख्या चीनहून जास्त होणे अपेक्षित होते. ताज्या अंदाजानुसार ही शक्यता दोन वर्षे पुढे वर्तविण्यात आली आहे.
सध्या लोकसंख्येच्या बाबतीत चीन (1.41 अब्ज) व भारत (1.34 अब्ज) हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहेत. सन 2024 पर्यंत या दोन्ही देशांची लोकसंख्या 1.41 अब्जच्या आसपास राहील. त्यानंतर भारताची लोकसंख्या वाढत राहून सन 2030 मध्ये 1.5 अब्ज व सन 2050 मध्ये 1.66 अब्जापर्यंत पोहोचेल. याउलट चीनची लोकसंख्या सन 2030पर्यंत स्थिर राहील व त्यानंतर तिच्यामध्ये काहीशी घट होणे अपेक्षित आहे.
या अहवालानुसार 2050 नंतरच्या अर्ध्या शतकात भारताच्या लोकसंख्येत घट अपेक्षित असून, सन 2100 पर्यंत ती कमी होत 1.51 अब्जांवर पोहोचेल. तरीही त्यावेळी भारत हाच सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल.
हा अहवाल म्हणतो की, सध्या 7.6 अब्ज असलेली जगाची लोकसंख्या सन 2030 मध्ये 8.6 अब्ज, सन 2050 मध्ये 9.8 अब्ज व सन 2100 मध्ये 11.2 अब्जांवर पोहोचलेली असेल. सध्या जगाच्या लोकसंख्येत दरवर्षी 8 कोटी 30 लाखांनी भर पडत आहे. पुढील अनेक दशके प्रजनन दरात घट होत जाईल, असे गृहित धरले तरीही जगाची लोकसंख्या मात्र कमी होण्याऐवजी वाढतच जाईल.
सन 2017 ते 2050या काळात जागतिक लोकसंख्येतील एकूण वाढीपैकी निम्मी वाढ भारत, नायजेरिया, काँगो, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, अमेरिका, युगांडा, इंडोनेशिया व इजिप्त या 10 देशांमध्ये होणे अपेक्षित आहे.
जगातील 10 सर्वात मोठ्या देशांमध्ये लोकसंख्येत सर्वाधिक वेगाने वाढ होण्यात नायजेरियाचा पहिला क्रमांक लागतो. सध्या नायजेरिया सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. मात्र 2050 पूर्वी तो अमेरिकेस मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत भारत व चीननंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश होईल.
देशादेशांमध्ये आर्थिक विकास आणि लोकसंख्या या बाबतीत मोठी विषमता कायम राहणार असल्याने अधिक चांगल्या आयुष्याच्या शोधात आणखी काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरुच राहील. सन 2050 पर्यंत ज्या 10 प्रमुख देशांमध्ये वर्षाला एक लाखांहून अधिक लोक स्थलांतर करणे अपेक्षित आहे. त्यांत अमेरिका, जर्मनी, कॅनडा ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व रशिया यांचा समावेश असेल. या काळात ज्या देशांमधून दरवर्षी एक लाखांहून अधिक लोक अन्यत्र स्थलांतर करण्याची शक्यता आहे, त्यांत भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, मेक्सिको व फिलिपिन्स यांचा समावेश असेल.