Omicron: ओमायक्रॉनचा पुढचा प्रकार अधिक घातक? केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा संशोधनातून निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 06:06 AM2022-01-08T06:06:54+5:302022-01-08T06:07:38+5:30
क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी या विषयाचे प्राध्यापक असलेले रवींद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी ओमायक्रॉनचा सखोल अभ्यास केला.
लंडन : ओमायक्राॅनचा सध्या अस्तित्वात असलेला विषाणू हा फारसा धोकादायक नाही, ही त्याच्यात झालेल्या परिवर्तन प्रक्रियेतील एक चूक होती. मात्र, ओमायक्रॉनचा आगामी प्रकार अतिशय घातक असू शकतो, असे केंब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशीय शास्त्रज्ञ रवींद्र गुप्ता यांनी म्हटले आहे.
क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी या विषयाचे प्राध्यापक असलेले रवींद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी ओमायक्रॉनचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या निष्कर्षात म्हटले आहे की, ओमायक्रॉनच्या संसर्गाने इंग्लंड व भारतासह अनेक देशांना वेढले आहे. या विषाणूपासून फुप्फुसांना कमी धोका आहे, असे वैद्यकीय निरीक्षणांत आढळून आले. कोरोनाचा विषाणू हा घातकच आहे. ओमायक्राॅनचा सध्याचा विषाणू त्याच्या परिवर्तनातील चुकीमुळे कमी घातक आहे. पण, भविष्यात या विषाणूचा नवा प्रकारही माणसासाठी खूप तापदायक ठरू शकतो. गुप्ता यांनी सांगितले की, कोरोनाच्या विविध विषाणूंचे माणसांच्या प्रकृतीवर नेमके काय परिणाम होतात, त्याची अतिशय सविस्तर माहिती मिळण्यास अजून काही कालावधी जावा लागेल. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी या संसर्गामुळे जगात मरण पावलेल्यांची संख्याही कमी नाही. मात्र, संसर्गाला पायबंद घालण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.
आठवडाभरातच देशात नव्या रुग्णांच्या संख्येत पाच पट वाढ
n काेराेना महामारीच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांनाच देशभरात एक लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १ लाख १७ हजार ९४ नव्या रुग्णांची नाेंद झाली आहे तर ३०२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी ३१ डिसेंबरला २२ हजार ७७५ नवे रुग्ण आढळले हाेते. त्यानंतर आठवडाभरात रुग्णसंख्येत ५ पट वाढ झाली आहे.
n आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आता प्रवाशांना ७ दिवस गृह विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.
n देशात ६ जून रोजी १ लाख नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर तब्बल ७ महिन्यांनी एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत ३ काेटी ५२ लाख काेराेना रुग्णांची नाेंद झाली आहे. त्यापैकी ३.४३ काेटी रुग्ण बरे झाले असून ४.८३ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
nओमायक्राॅनची रुग्णसंख्या ३००७ झाली आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा ३ लाख ६५ हजार ५२१ वर पाेहाेचला असून त्यात ८६ हजारांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.