तुरुंगावर मोठा हल्ला, डायनामाइटने भिंत उडवून केली 800 कैद्यांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:25 PM2021-10-24T12:25:29+5:302021-10-24T12:26:29+5:30
Jailbreak In Nigeria: या वर्षी एप्रिलमध्ये तुरुंगावर हल्ला करुन 1800 कैद्यांची सुटका केली होती.
अबुजा: तुम्ही प्रिझन ब्रेक म्हणजेच तुरुंग तोडून कैद्यांची सुटका केल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. पण, नायजेरियात एक असं प्रकरण घडलं आहे, ज्यात एका टोळीने तब्बल 800 कैद्यांची सुटा केली आहे. नायजेरियातील अबुजा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नायजेरियाच्या ओयो प्रांतात डाकूंच्या एका टोळीने तुरुंगावर हल्ला करुन आपल्या 800 साथीदारांची सुटका केली आहे.
डायनामाइटने भिंत फोडली
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नायजेरिया कारागृहाच्या बाहेर मोठ्या संख्येने बंदूकधारी जमा झाले. यानंतर त्यांनी कारागृहावर गोळीबार सुरू केला. कारागृहाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी प्रत्युत्तर दिले, पण ते बंदूकधारी टोळीचा जास्त सामना करू शकले नाहीत. यानंतर डाकूंनी डायनामाइटने तुरुंगाची भिंत उडवली.
800 हून अधिक कैदी पसार
कारागृहाची भिंत उडवल्यानंतर दरोडेखोरांनी बंदुका घेऊन तुरुंगात प्रवेश केला आणि त्यांच्या साथीदारांची सुटका केली. कारागृहाची भिंत फोडल्यानंतर 834 कैदी कारागृहातून पळून गेले. मात्र, पोलिसांनी मोहीम राबवून 262 पळून गेलेल्या कैद्यांना पुन्हा ताब्यात घेतले असून 575 कैद्यांचा शोध सुरू आहे. सध्या सर्व फरार कैद्यांचा शोध सुरू आहे.
हल्लेखोरांकडून सतत तुरुंगांना लक्ष्य
उल्लेखनीय म्हणजे, डाकू सतत त्यांच्या साथीदारांना सोडवण्यासाठी तुरुंगांना लक्ष्य करत आहेत. ओयो प्रांतातील कारागृहावरील हल्ला हा या कारागृहावरील तिसरा मोठा हल्ला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये डाकुंनी इमो प्रांतातील तुरुंगावर हल्ला करून 1,800 कैद्यांची सुटका केली होती. याशिवाय गेल्या महिन्यात कोगी प्रांतातील दरोडेखोर तुरुंगावर हल्ला करून 266 कैद्यांची सुटका केली होती.