नाइटक्लबवर अतिरेकी हल्ला
By Admin | Published: January 2, 2017 06:12 AM2017-01-02T06:12:27+5:302017-01-02T06:12:27+5:30
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ओर्टकॉय जिल्ह्यातील इस्तंबूल नाइटक्लबमध्ये जमलेल्यांवर हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात १६ विदेशींसह
इस्तंबूल : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ओर्टकॉय जिल्ह्यातील इस्तंबूल नाइटक्लबमध्ये जमलेल्यांवर हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात १६ विदेशींसह (दोन भारतीयांचाही समावेश) ३९ जण ठार तर ६९ जण जखमी झाले. रविवारी सकाळी १.१५ वाजता (स्थानिक वेळ) हा हल्ला झाला.
सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या या हल्लेखोराने क्लबच्या प्रवेशद्वारापाशीच पोलिसाला व एका नागरिकाला ठार मारले व नंतर तो आत गेला, असे तुर्की अधिकाऱ्यांनी सांगितले. रिईना क्लब असे या नाइटक्लबचे नाव असून, तो येथे प्रचंड प्रसिद्ध आहे. अंतर्गत मंत्री सुलेमान सोयलू म्हणाले की, हल्लेखोर पळून गेला. २१ मृतांची ओळख पटली असून, त्यातील १६ विदेशी तर पाच तुर्कस्तानचे आहेत. ६९ जणांवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)
डोगॅन वृत्त संस्थेने दोन हल्लेखोर सांताक्लॉजच्या वेशात आल्याचे म्हटले असले तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
हल्लेखोराने शेकडो जणांवर गोळीबार केला, असे इस्तंबूलचे गव्हर्नर वासिप साहिन यांनी सांगितले. ते म्हणाले, हा दहशतवादी हल्लाच आहे.
हल्लेखोर हा अरेबिक बोलत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटले. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी घेतलेली नाही.