गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 09:08 AM2024-06-17T09:08:32+5:302024-06-17T09:10:06+5:30

सध्या निखिल गुप्ता याला ब्रुकलिन येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

Nikhil Gupta, suspect in plot to kill Gurpatwant Singh Pannun, extradited to US | गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत

गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत

वॉशिंग्टन : खलिस्तान समर्थक दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर आता निखिल गुप्ताचे प्रत्यार्पण करण्यात अमेरिकेला यश आल्याचे वृत्त समोर आले आहे. यूएस फेडरल ब्युरो ऑफ प्रिझन्स आणि या प्रकरणाशी संबंधित तज्ज्ञांच्या वेबसाइटनुसार, ५२ वर्षीय भारतीय नागरिक निखिल गुप्ताचे चेक रिपब्लिकमधून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले आहे. सध्या निखिल गुप्ता याला ब्रुकलिन येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येच्या अयशस्वी नियोजनात निखिल गुप्ता याचा हात असल्याचा संशय अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. निखिल  गुप्ताने एका भारतीय अधिकाऱ्यासोबत गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप यूएस फेडरल वकिलांनी केला आहे. वृत्तानुसार, निखिल गुप्ता हा गेल्या वर्षी चेक रिपब्लिकची राजधानी प्राग येथे गेले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, गुरपतवंत सिंग पन्नू हा अमेरिकेत राहतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतविरोधी कारवाया करतो. भारतासोबतच गुरपतवंत सिंग पन्नू हिंदूंनाही धमकावतो.

गुप्ताचे अपील फेटाळले
निखिल गुप्ता याने प्रत्यार्पण टाळण्याची विनंती करूनही, चेक रिपब्लिक न्यायालयाने गेल्या महिन्यात त्याचे अपील फेटाळले होते. यानंतर चेक रिपब्लिकच्या न्यायमंत्र्यांना निखिल गुप्ताला अमेरिकेला पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, अमेरिका आणि कॅनडामधील खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करून हत्येचा कट रचल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर भारत आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध ताणले गेले होते. भारत सरकारने या कटात सहभाग असल्याचा आरोप फेटाळला आहे.

काय म्हणाला गुरपतवंत सिंग पन्नू?
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाने दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताच्या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचा आरोप केला होता. जून २०२३ मध्ये कनामा येथील गुरुद्वारासमोर निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुरपतवंत सिंग पन्नू याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गुरपतवंत सिंग पन्नूने सांगितले की, निखिल गुप्ताचे प्रत्यार्पण हा एक सकारात्मक घडामोडी आहे, परंतु निखिल गुप्ता हा केवळ एक शिपाई असल्याचे मत आहे. निखिल गुप्ता यांची नियुक्ती करण्यासाठी जबाबदार असलेले लोक भारत सरकारमध्ये उच्च पदावर आहेत, असा आरोप गुरपतवंत सिंग पन्नूने केला आहे.

Web Title: Nikhil Gupta, suspect in plot to kill Gurpatwant Singh Pannun, extradited to US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.