डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट; १७ वर्षीय तरुणानं आधी आई वडिलांना संपवलं, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:41 IST2025-04-14T11:39:03+5:302025-04-14T11:41:03+5:30
FBI कडून या तरुणावर दोषारोप पत्र ठेवत केवळ ट्रम्प यांची हत्या नाही तर अमेरिकेचं सरकार पाडण्याचं प्लॅनिंग त्याने केले होते असा गंभीर दावा करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट; १७ वर्षीय तरुणानं आधी आई वडिलांना संपवलं, मग...
अमेरिकेच्या विस्कॉन्सिन स्टेटमध्ये राहणाऱ्या अवघ्या १७ वर्षाच्या निकिता कॅसप या युवकाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी त्याने स्वत:च्या आई वडिलांचा खून केल्याचा आरोप आहे. आई वडिलांना मारून घरातील सर्व पैसे घेऊन पळून जायचे आणि त्यानंतर याच पैशातून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करून अमेरिकेतलं सरकार पाडायचं असा त्याचा प्लॅन असल्याचं उघड झाले आहे.
आरोपी युवकानं फेब्रुवारीत ३५ वर्षीय आई तातियाना कॅसप आणि ५१ वर्षीय सावत्र पिता डोनाल्ड मेयर यांचा खून केला. आई वडिलांना गोळी मारून निकिताने त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. जवळपास २ आठवडे तो मृतदेहांसोबतच त्याच घरात राहिला. त्यानंतर १४ हजार डॉलर, पासपोर्ट आणि पाळीव श्वान घेऊन तो पसार झाला. कॅसप यांच्या नातेवाईकांना निकिता कॅसपवर संशय आला त्यांनी ही घटना पोलिसांना कळवली. त्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला. FBI कडून या तरुणावर दोषारोप पत्र ठेवत केवळ ट्रम्प यांची हत्या नाही तर अमेरिकेचं सरकार पाडण्याचं प्लॅनिंग त्याने केले होते असा गंभीर दावा करण्यात आला आहे.
निकिता कॅसपच्या चौकशीत अनेक घटनांचा खुलासा झाला आहे. त्यात ३ पानी यहूदी विरोधी कागदपत्रे, एडोल्फ हिटलरचं कौतुक, टीकटॉक आणि टेलिग्रामवर कट्टरपंथी विचारांचा प्रसार, ट्रम्प यांना राष्ट्राचा शत्रू समजून त्यांची हत्या करण्याची बाब हे तपासात कळलं आहे. निकिता कॅसपने टेलिग्रामवरून एका रशियाच्या व्यक्तीशी संपर्क केला होता. त्याने यूक्रेनला पळण्याची योजना बनवली होती. मार्चमध्ये कॅसपला अटक करण्यात आली.
दरम्यान, निकिता कॅसपवर याआधी ९ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यात आई वडिलांची हत्या करणे, मृतदेह लपवणे, १० हजाराहून अधिक डॉलर संपत्ती चोरणे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट असे आरोप त्याच्यावर आहेत. नाझी विचारांनी प्रभावित निकिता कॅसपच्या मोबाईलमध्ये नाझी विचारांच्या द ऑर्डर ऑफ नाइन अँगल्स संबंधित काही गोष्टी सापडल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. कॅसपला ९ एप्रिलला कोर्टासमोर हजर करण्यात आले. आता या प्रकरणाची सुनावणी ७ मे रोजी होणार आहे.