७१ वर्षांनी, नव्वदीत आजींनी घेतली पदवी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 07:28 AM2023-01-28T07:28:52+5:302023-01-28T07:29:24+5:30
अमेरिकेतील जॉईस डिफॉ नावाच्या एका ९० वर्षांच्या आजीबाईंना नुकतीच एक पदवी मिळाली. हा पदवी घेताना त्यांनी रितसर ग्रॅज्युएशनची टोपी घातली होती
अमेरिकेतील जॉईस डिफॉ नावाच्या एका ९० वर्षांच्या आजीबाईंना नुकतीच एक पदवी मिळाली. हा पदवी घेताना त्यांनी रितसर ग्रॅज्युएशनची टोपी घातली होती आणि त्यांनी स्टेजवर जाऊन तो डिप्लोमा स्वीकारला. उतारवयात शिक्षण घेणाऱ्या लोकांच्या कहाण्या सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकलेल्या असतात. काही वेळा माणसाची आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळे त्याला लवकर कमावणं भाग असतं. अशा वेळी शिक्षण का नोकरी, असा प्रश्न समोर उभा राहतो. बहुतेक वेळा त्यात नोकरी करण्याला प्राधान्य दिलं जातं आणि मग त्या व्यक्तीचं शिक्षण मागं राहून जातं.
काही वेळा एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या गावात अमुक इतक्या इयत्तेपर्यंतचंच शिक्षणच उपलब्ध असतं. त्यानंतरच्या शिक्षणासाठी दूर कुठेतरी जायला लागणार असतं. ते अनेकांना शक्य होत नाही. विशेषत: मुलींच्या बाबतीत पालक त्यांना शिकायला बाहेर पाठवायला नकार देतात. काही वेळा मुला- मुलींना लहान वयात चुकीची सांगत लागते. ज्या वयात अभ्यास करायचा त्या वयात इतर उद्योग केले जातात आणि मग हळूहळू शिक्षण मागं पडून जातं; पण या बहुतेक सगळ्या व्यक्ती मुळात कॉलेजला ॲडमिशनच घेत नाहीत. मात्र, नंतरच्या वयात, जबाबदाऱ्या कमी झाल्यावर ते पुन्हा शिक्षण घेण्याचा विचार करतात. असे अनेक लोक रूढ अर्थाने शिक्षणाचं वय उलटून गेल्यानंतर कुठल्या तरी कॉलेजला किंवा कोर्सला ॲडमिशन घेताना दिसतात.
मात्र, अमेरिकेतील जॉईस डिफॉ या आजीबाईंच्या बाबतीत यातलं काहीच घडलं नाही. त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती.
त्यांना कोणी शिक्षणासाठी आडकाठीही केली नव्हती. त्यांना शिक्षणासाठी दूर जावं लागेल, अशीही काही परिस्थिती नव्हती किंवा त्यांना कुठली वाईट संगतही लागलेली नव्हती. जॉईस यांचं त्यावेळचं नाव जॉईस व्हायोला केन होतं. त्यांनी १९५१ साली, म्हणजे तब्बल ७१ वर्षांपूर्वी नॉर्दर्न इलिनॉय विद्यापीठात ॲडमिशन घेतली होती. त्यावेळी त्यांना होम इकॉनॉमिक्स नावाच्या विषयात डिग्री घ्यायची होती.
त्याप्रमाणे त्यांनी साडेतीन वर्षे कॉलेज केलं. मात्र, कॉलेजचं चौथं वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना चर्चमध्ये एक स्पेशल माणूस भेटला. डॉन फ्रीमन सीनिअर नावाच्या या तरुणाच्या त्या प्रेमात पडल्या. त्यांनी शिक्षण सोडून दिलं आणि डॉन फ्रीमन सीनिअर यांच्याशी १९५५ साली लग्न केलं. त्या दोघांना तीन मुलंही झाली. दोघांचा संसार आनंदात सुरू असतानाच फ्रीमन यांचा मृत्यू झाला आणि जॉईस यांच्या एकटीवर तीन मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी येऊन पडली.
मात्र, फ्रीमन यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी त्यांना रॉय डिफॉ भेटले आणि जॉईस यांनी त्यांच्याशी पुनर्विवाह केला. रॉय डिफॉ आणि जॉईस यांना एकूण सहा मुलं झाली. त्यात जुळ्या मुलांच्या दोन जोड्यांचाही समावेश आहे. जॉईस यांना आजघडीला सात नातवंडं आणि २४ पतवंडं आहेत. एका दृष्टीने बघितलं तर त्यांचं आयुष्य छान सुरू होतं. नियतीने पहिलं प्रेम हिरावून घेतल्यानंतरदेखील त्यांना पुन्हा एकदा जोडीदार भेटला. तरीही काही तरी राहून गेल्यासारखं वाटत होतं.
२०१९ सालच्या आसपास त्यांनी कधी तरी हे बोलून दाखवलं, की त्यांनी शिक्षण पूर्ण केलं नाही याची रुखरुख त्यांच्या मनात राहून गेलेली होती. त्यावेळी ८७ वर्षे वय असणाऱ्या जॉईस यांच्या मुलांनी त्यांना पुन्हा कॉलेजला ॲडमिशन घेऊन शिक्षण पूर्ण करण्याबद्दल सुचवलं. एकदा शिक्षण पूर्ण करायचं ठरवल्यावर त्यांनी विद्यापीठाकडे चौकशी केली आणि पूर्वी ॲडमिशन घेतलेली होती हे सांगितलं. मात्र, ज्यावेळी त्यांनी जुन्या प्रवेशाचं वर्ष सांगितलं त्यावेळी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा त्यावर विश्वासच बसेना. जॉईस आजीबाईंची जुनी ॲडमिशन होती. ती त्यांनी कंटिन्यू केली. मात्र, यावेळी प्रत्यक्ष वर्गात जाण्याच्या ऐवजी त्यांनी कॉम्प्युटरसमोर बसून शिकायला सुरुवात केली. तो त्यांच्या आयुष्यातील पहिला कॉम्प्युटर होता. तो कसा वापरायचा याचं प्रशिक्षण त्यांना त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी दिलं. त्यानंतर कोविडचा काळ सुरू झाला. त्यावेळी त्यांना कॉम्प्युटर शिकल्याचा फारच फायदा झाला. मग तीन वर्षांनी आणि मुळात ॲडमिशन घेतल्यापासून तब्बल ७१ वर्षांनी बॅचलर ऑफ जनरल स्टडिज ही पदवी घेऊन उत्तीर्ण झाल्या. मनात खोलवर दडून राहिलेलं एक स्वप्न अखेर पूर्ण झालं.
‘का नाही?’, या प्रश्नानं दिलं उत्तर!
जेना डूले ही जॉईसची एक पणती त्याच विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. ती म्हणते, “जॉईसने ॲडमिशन घेतली त्यावेळी ‘का?’ यापेक्षा ‘का नाही’ याचा तिने जास्त विचार केला. त्यातच तिला उत्तर मिळालं. ती मुळात अतिशय चांगली विद्यार्थिनी आणि शिक्षिका आहे. त्यामुळे तिची ही पदवी मिळवणं आमच्यासाठी फार आनंददायक आहे.”