Nirav Modi: नीरव मोदीने मला मारुन टाकण्याची धमकी दिली; ब्रिटीश कोर्टात ‘त्या’ व्यक्तीचा व्हिडीओ सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 08:18 AM2020-05-14T08:18:48+5:302020-05-14T08:22:28+5:30
त्यांच्या म्हणण्यानुसार तेथे त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि संशयित कागदपत्रांवर नीरवचा भाऊ नेहल मोदी यांनी त्यांच्या इच्छेविरूद्ध स्वाक्षरी केली.
लंडन – फसवणूक आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणातील आरोपी नीरव मोदीच्या संबंधित कंपन्यांमध्ये असलेल्या बनावट संचालकांनी केलेल्या व्हिडीओत चोरीचा आणि हत्येची धमकी दिल्याचा आरोप आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी हा व्हिडीओ ब्रिटीश कोर्टात सादर केला. सध्या कोर्टात नीरव मोदीच्या प्रत्यार्पणावर सुनावणी सुरु आहे. या आठवड्यात सुनावणीदरम्यान लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखवण्यात आलेल्या या व्हिडीओ ६ भारतीयांची साक्ष घेण्यात आली आहे. या प्रत्येकाने दुबई सोडण्यास भाग पाडले गेले आणि इजिप्तला कैरो येथे येण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार तेथे त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि संशयित कागदपत्रांवर नीरवचा भाऊ नेहल मोदी यांनी त्यांच्या इच्छेविरूद्ध स्वाक्षरी केली. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सांगत आहे की, माझे नाव आशिष कुमार मोहनभाई लाड आहे, मी दुबईतील सनशाईन जेम्स लिमिटेड, हाँगकाँग आणि युनिटी ट्रेडिंगचे नाममात्र मालक आहे.' नीरव मोदी यांनी मला फोनवरुन धमकी दिली की ते चोरीच्या आरोपाखाली अडकवतील तसेच त्याने अश्लील शब्दांचा वापर केला त्याचसोबत मला मारुन टाकण्याचीही धमकी दिली. हा व्हिडीओ जून २०१८ चा आहे.
दरम्यान, भारत सरकारने बुधवारी लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात फरार हिरा व्यापारी नीरव मोदीविरूद्ध पुरावे सादर केले. पंजाब नॅशनल बॅंकेत घोटाळा आणि मनी लॉन्ड्रींग आरोप करणारे नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमध्ये सुनावणी सुरू आहे. यापूर्वी नीरवच्या वकिलाने दावा केला होता की त्यांची 'मानसिक स्थिती' गंभीर आहे. सध्या पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करणारा आरोपी नीरव लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात कैद आहे.
नीरव मोदी घोटाळ्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला, नीरव मोदीसह त्याचा मामा मेहुल चोकसी यांचेही नाव घोटाळ्यात होते. गेल्या वर्षी जेव्हा नीरव मोदी लंडनमध्ये दिसला होता, तेव्हा मार्चमध्ये त्याला मेट्रो स्टेशनवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात बंद आहे. दरम्यान नीरव मोदीने ५ वेळा जामिनासाठी प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी कोर्टाने त्यांना नकार दिला. भारताच्या तपास अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रकरणात हा निर्णय भारताच्या बाजूने येईल.