ब्रिटिश प्रशासन, इंटरपोलच्या डोळ्यात धूळ फेकत नीरव मोदीने केली अमेरिकावारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 08:07 PM2019-04-02T20:07:34+5:302019-04-02T20:08:54+5:30
रेड कॉर्नर नोटीस निघाले असतानाही हा नीरव मोदी फेब्रुवारी महिन्यात इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशानाच्या डोळ्यात धुळफेक करत अमेरिकेला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे.
लंडन - पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालून पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या इंग्लंडमध्ये अटकेत आहे. मात्र त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस निघाले असतानाही हा नीरव मोदी फेब्रुवारी महिन्यात इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशानाच्या डोळ्यात धुळफेक करत अमेरिकेला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भारतीय तपास संस्थांनी ब्रिटिश प्रशासनाच्या कार्यप्रणालीविरोधात नाराजी नोंदवली आहे. इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावलेली असतानाही निरव मोदीला अमेरिकेला जाण्याची परवानगी कशी काय मिळाली, असा प्रश्न भारताकडून उपस्थित करण्यात आला आहे.
जेव्हा कुठल्याही व्यक्तीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली जाते तेव्हा त्या व्यक्तीला कुठल्याही देशाचे इमिग्रेशन अधिकारी ताब्यात घेऊ शकतात. मात्र निरव मोदी अमेरिकेला कसा गेला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. भारतीय यंत्रणांकडे निरव मोदीच्या अमेरिका प्रवासाची विसृत माहिती आहे. तसेच त्याचे तिकिटही भारतीय तपास यंत्रणांकडे आहे. या कागदपत्रांचा वापर नीरव मोदी ज्यावेळी न्यायालयात जामिनासाठी अर्ज करेल त्यावेळी पुरावा म्हणून केला जाणार आहे. सध्या इंग्लंडमधील वेस्टमिंस्टर कोर्टाने नीरव मोदीला 26 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावलेली आहे. दरम्यान, त्याचे लवकरात लवकर भारतात प्रत्यार्पण व्हावे, यासाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरारी झालेल्या नीरव मोदीला ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात अटक करण्य़ात आली होती. 29 मार्च रोजी त्याच्या जामीनअर्जावर तेथील न्यायालयाने सुनावणी घेतली होती. यावेळी त्याचा जामीन नाकारण्यात आला. र नीरव मोदीच्या वकिलाने तो जानेवारी 2018 पासून ब्रिटनमध्ये राहत असून लपून राहत नाही. तसेच जर त्याला जामीन देणार नसाल तर त्याला नजरकैदेत ठेवण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. तसेच त्याला स्थानिक पोलिस ठाण्यात रोज हजेरी लावण्याचे आणि मोबाईल देण्याची मागणीही केली होती.