प्रतिष्ठेसाठी बहिणीची पतीसह निर्घृण हत्या
By admin | Published: June 20, 2016 05:05 AM2016-06-20T05:05:30+5:302016-06-20T05:05:30+5:30
कुटुंबियांच्या संमतीशिवाय व स्वत:च्या पसंतीच्या तरुणाशी लग्न केल्याबद्दल गरोदर बहीण व तिच्या पतीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
लाहोर : कुटुंबियांच्या संमतीशिवाय व स्वत:च्या पसंतीच्या तरुणाशी लग्न केल्याबद्दल गरोदर बहीण व तिच्या पतीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मुहम्मद शकील (३०) आणि त्याची पत्नी अक्सा (२६) यांना कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी ठार मारण्यात आले. अक्साचा भाऊ नुकताच सौदी अरेबियाहून परतला होता, असे पोलिसांनी सांगितले. मृत जोडप्याचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते व ते पंजाब प्रांतातील थिकरीवाला खेड्यात राहत होते.
चार दिवसांपूर्वी अक्साचा भाऊ, त्याची आई, मामा व आणखी एक जण जोडप्याच्या घरात धडकले व त्यांना त्यांनी अत्यंत निष्ठुरपणे मारहाण केली. नंतर ते त्या दोघांना अज्ञात ठिकाणी घेऊन गेले व तेथे त्यांना त्यांनी गोळ्या घातल्या, असे ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने वृत्त दिले.
दोघांचेही मृतदेह गुरुवारी रात्री गुजरा-जंग कालव्यातून बाहेर काढण्यात आले. शकील फैसलाबादेतील सरकारी शाळेत, तर अक्सा ग्रामीण आरोग्य केंद्रात कामाला होती. शकीलचे वडील खुशी मुहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीवरून थिकरीवाला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शवविच्छेदनात त्या दोघांचा मृत्यू बंदुकीच्या गोळ्या डोक्यात मारल्यामुळे झाल्याचे म्हटले. अंगावर जखमाही आढळल्या. अक्सा चार दिवसांनी बाळाला जन्म देणार होती, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला अटक झाली असून, इतर फरार आहेत. (वृत्तसंस्था)
प्रतिष्ठेसाठी १,१०० बळी... दोन दिवसांपूर्वी गुजरनवाला प्रांतात २२ वर्षांच्या गरोदर मुलीला तिच्याच आईने ठार मारले होते. या मुलीने तिच्या कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध स्वत:चे लग्न ठरविले होते. गेल्या आठवड्यात लाहोरमध्ये १८ वर्षांच्या युवतीला जिवंत जाळण्यात आले होते. तिने स्वत:च्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले होते. पाकिस्तानात गेल्या वर्षी कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी किमान १,१०० महिलांना त्यांच्याच नातेवाईकांनी ठार मारले.