कैलासा देश बनवणाऱ्या नित्यानंदचा नवा कारनामा, या देशाची लाखो एकर जमीन बळकावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:26 IST2025-03-25T17:25:56+5:302025-03-25T17:26:39+5:30
स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कैलासा देश बनवणाऱ्या नित्यानंदचा नवा कारनामा, या देशाची लाखो एकर जमीन बळकावली
भारतातून पळून गेलेला आणि 'कैलासा' नावाच्या देशाची निर्मिती करुन संपूर्ण जगाला धक्का देणारा स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नित्यानंद याने त्याच्या कैलासा देशाच्या सीमांचा विस्तार केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्याने दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियावर हल्ला केला अन् आपल्या शिष्यांसह तेथील 4.8 लाख हेक्टर जमीन बळकावली. ही माहिती मिळताच भारतापासून ते बोलिव्हियापर्यंतची सरकारे सतर्क झाली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नित्यानंद आणि त्याच्या शिष्यांनी फसवणूक आणि चलाखीने बोलिव्हियामधील आदिवासींची जमीन खरेदी केली होती. जमीन खरेदी केल्यानंतर नित्यानंदने ही जमीन कैलासा देशाचा विस्तार म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच जमीन खरेदी केल्याची बातमी मीडियात आली.
4.8 लाख हेक्टर जमिन बळकावली
नित्यानंद आणि त्याच्या शिष्यांनी मिळून बोलिव्हियामध्ये 4 लाख 80 हजार एकर सरकारी जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे. ही जमीन 1000 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. जमिनीसाठी भाडेपट्टा म्हणून रुपये 8.96 लाख/वर्ष, मासिक रक्कम म्हणून 74,667 रुपये आणि दैनंदिन रक्कम म्हणून 2,455 रुपये देण्याचा प्रस्ताव होता. बोलिव्हियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले की, बोलिव्हिया "युनायटेड स्टेट्स ऑफ कॅलेसा" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित राष्ट्राशी राजनैतिक संबंध ठेवत नाही.
नित्यानंदने काय केले?
रिपोर्टनुसार, कैलासाचे प्रतिनिधी बोलिव्हियामध्ये जमीन घेण्यासाठी अनेक महिन्यांपासून खेटा मारत होते. जागा ताब्यात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांची मदत घेतली. डील फायनल झाल्यानंतर नित्यानंदच्या टीमला लोकांकडून ॲग्रीमेंटही मिळाले. मात्र, त्याची बातमी लगेचच स्थानिक माध्यमांमध्ये लीक झाली. ही बातमी मीडियात आल्यानंतर नित्यानंद आणि त्याच्या शिष्यांनी स्थानिक पत्रकारांना धमक्याही दिल्या, पण सरकारवर दबाव वाढल्यावर नित्यानंदचा संपूर्ण व्यवहार रद्द केला.
कोण आहे नित्यानंद?
नित्यानंद 2019 पासून भारतातून फरार असून, त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. त्याने भारतातून पळून गेल्यानंतर कैलासा नावाच्या कथित राष्ट्राची स्थापना केली. या देशात त्याचे स्वतःचे चलन आणि संविधान असल्याचा दावाही केला जातो. नित्यानंद भारतात कथित धर्मगुरू म्हणून कार्यक्रम करायचा. 2010 मध्ये त्याची अश्लील सीडी व्हायरल झाली होती. तर, 2012 मध्ये नित्यानंदवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2019 मध्ये नित्यानंदवर दोन मुलींचे अपहरण आणि बंदिवासात ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नित्यानंद देश सोडून पळून गेल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकली नाही.