ना कॅश, ना इंधन, पाकवर मोठं संकट; तेल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिक सुट्ट्या देण्याचा प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 10:53 AM2022-05-24T10:53:59+5:302022-05-24T10:55:21+5:30
Pakistan : कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस कमी करून, इंधन बचत करता येईल का, यावर सध्या पाकिस्तान सरकार विचार करत आहे. एवढेच नाही, तर असे केल्यास वर्षाला 2.7 अब्ज डॉलर एवढे परकीय चलन वाचवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.
पाकिस्तानात सरकार बदलले. इम्रान सरकार जाऊन शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले. पण परिस्थिती, अजिबात बदललेली दिसत नाही. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तान सरकारने आता तेल वाचवण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस कमी करून, इंधन बचत करता येईल का, यावर सध्या पाकिस्तान सरकार विचार करत आहे. एवढेच नाही, तर असे केल्यास वर्षाला 2.7 अब्ज डॉलर एवढे परकीय चलन वाचवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.
या दृष्टीने स्टेट बँक ऑफ पाकिस्तान तीन संभावनांवर अभ्यास करत आहे. असे केल्यास 1.5 अब्ज अमरिकन डॉलर ते 2.7 अब्ज अमेरिकन डॉलर एवढे परकीय चलन वाचविले जाऊ शकते, असे मानले जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, चालू आर्थिक वर्षातील जुलै ते एप्रिलपर्यंतच्या पहिल्या 10 महिन्यांत पाकिस्तानच्या तेल आयातीत 17 अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीचा विचार करता, हे प्रमाण 96 टक्क्यांनी वाढले आहे.
लावण्यात आलेल्या अंदाजानुसार, दर आठवड्याचा एक वर्किंग डे पाकिस्तानवर 642 मिलियन डॉलरचे ओझे टाकतो. यात मालवाहतूक आणि सामान्य वाहतूकीचा समावेश नाही.
सुचविण्यात आलेल्या पर्यायांत लॉकडाऊनचाही उल्लेख -
- पहिल्या पर्यायात, कामाचे दिवस चार करण्यात यावेत आणि तीन सुट्ट्या देण्यात याव्या, असे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे, एका महिन्यात 122 दशलक्ष डॉलर एवढे परकीय चलन वाचविले जाऊ शकते. वर्षाचा हिशेब केल्यास हे साधारणपणे 1.5 अब्ज डॉलर एवढे असेल.
- दुसऱ्या पर्यायात चार कामकाजाचे दिवस, दोन सुट्ट्या आणि एक दिवसाचा लॉकडाऊन असे सांगण्यात आले आहे. असे केल्यास एका महिन्यात 175 दशलक्ष डॉलर आणि एका वर्षात 2.1 अब्ज डॉलर वाचवता येतील, असे बोलले जात आहे.
- तिसऱ्या पर्यायात, चार कामाचे दिवस, एक सुट्टी आणि दोन दिवसांचा लॉकडाऊन (कमर्शिअल अॅक्टिव्हिटी बंद) सांगण्यात आला आहे. पेट्रोलियमशी संबंधित आयातीच्या बिलात या पद्धतीने महिन्याला 230 दशलक्ष डॉलर तर वर्षाला 2.7 अब्ज डॉलरची बचत होईल. याशिवाय, ऊर्जा विभाग वीज वाचविण्याचेही निर्देश दिले आहेत.