टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:38 IST2025-04-17T10:36:46+5:302025-04-17T10:38:10+5:30
खरे तर, या यादीत दरवर्षी एका तरी भारतीयाचे नाव असते. २०२४ मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपिक कुस्तीगीर साक्षी मलिक यांचा या यादीत समावेश होता.

टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
टाईम मॅगझीनने जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. मात्र, यावेळी या यादीत एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नाही. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे जवळचे उद्योगपती इलॉन मस्क यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. खरे तर, या यादीत दरवर्षी एका तरी भारतीयाचे नाव असते. २०२४ मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपिक कुस्तीगीर साक्षी मलिक यांचा या यादीत समावेश होता.
टाईम मॅगझिनची १०० प्रभावशाली लोकांची ही यादीही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेली असते. यात नेते, आयकॉन, टायटन्स, अभिनेते आदींचा समावेश असतो. भारतीय वंशाच्या रेश्मा केवलरामणी यांना या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र त्या भारतीय नागरिक नाहीत. केवलरामणी सध्या व्हर्टेक्स या औषध कंपनीच्या सीईओ आहेत. त्या जेव्हा अमेरिकेला गेल्या तेव्हा केवळ ११ वर्षांच्या होत्या. आता त्या अमेरिकेतील एका प्रसिद्ध बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या सीईओ आहेत. नेत्यांच्या यादीत ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांना स्थान मिळाले आहे. याशिवाय नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस, तसेच अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांचाही या यादीत समावेश आहे.
शी जिनपिंग आणि पुतिन यांसारख्या मोठ्या नेत्यांचाही समावेश नाही
या यादीत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांसारख्या दिग्गजांचाही समावेश नाही. याशिवाय, फ्रान्स आणि जर्मनी सारख्या शक्तिशाली युरोपीय देशांच्या नेत्यांनाही यात स्थान देण्यात आलेले नाही. याचे कारण म्हणजे, टाईम मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत केवळ अशाच नेत्यांना स्थान दिले जाते, जे अलिकडेच समोर आले आहेत आणि ज्यांच्या येण्याने समाजावर काही प्रभाव पडला आहे.