नो मिन्स नो... 11 कोटी लोकांनी तंबाखू, धूम्रपान सोडले; नवी पिढी कंपन्यांच्या जाहिरातीला भुलत नसल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:17 PM2024-01-18T12:17:12+5:302024-01-18T12:17:23+5:30
वॉशिंग्टन : जगात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या जगभरात मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, ...
वॉशिंग्टन : जगात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या जगभरात मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, २००० मध्ये तीन पैकी एक व्यक्ती धूम्रपान करत होती, तर आता पाचपैकी एक व्यक्ती धूम्रपान करत आहे.
आतापर्यंत जगातील तंबाखू उद्योग स्वतःच्या फायद्यासाठी जागतिक आरोग्य धोरणांवर प्रभाव टाकत आला आहे. अशात धूम्रपानात झालेली घट हे मोठे यश असल्याचे आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
सर्वाधिक धूम्रपानाचे प्रमाण कुठे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दक्षिण पूर्व आशिया आणि युरोपमध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
येथील लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक धूम्रपान करतात. इजिप्त, जॉर्डन आणि इंडोनेशियासारख्या काही देशांमध्ये तंबाखूचा वापर अजूनही वाढला आहे. इतर देशांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांकडे कल कमी झाला आहे. हा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखू नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन सरकारांना करतो.
कंपन्या काय करतात?
तंबाखूविरोधी मोहिमेवर कसा प्रभाव पडतो याचे उदाहरण पनामा येथील तंबाखू नियंत्रणावरील बैठकीत देण्यात आले. तेव्हा तंबाखू कंपन्यांनी काही देशांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढावे यासाठी तांत्रिक आणि आर्थिक मदत दिली होती.
तंबाखू नियंत्रणात चांगली प्रगती झाली आहे, परंतु समाधानकारक नाही. तंबाखू उद्योग अगणित जीव गमावून नफा कमावण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जाईल हे सांगता येत नाही.
- डॉ. रुएडिगर क्रेच, संचालक, डब्ल्यूएचओ