खिशात पैसे नाहीत?- या, बसा, पोटभर खा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:32 AM2023-09-09T07:32:47+5:302023-09-09T07:32:56+5:30
राहायला घर नाही, आज जेवण मिळालं, उद्याच्या जेवणाची खात्री नाही... अशी माणसं हाॅटेलमध्ये जातात, आवडीचा मेन्यू ऑर्डर करतात, पोटभर ...
राहायला घर नाही, आज जेवण मिळालं, उद्याच्या जेवणाची खात्री नाही... अशी माणसं हाॅटेलमध्ये जातात, आवडीचा मेन्यू ऑर्डर करतात, पोटभर जेवतात. जाताना खिसा चाचपडतात. शक्य असेल तर जेवणाचे पैसे देतात आणि नसले तर तसेच निघून जातात. जेवण केलं पण पैसे दिले नाहीत, म्हणून हाॅटेलचे कर्मचारी या लोकांची वाट अडवत नाहीत, पैसे नसताना हाॅटेलात जेवले म्हणून त्यांचा अपमान करत नाहीत... तुम्ही म्हणाल असं हाॅटेल कल्पनेत असू शकतं, प्रत्यक्षात कुठे? पण आहे असं हाॅटेल प्रत्यक्षातही आहे. या हाॅटेलचं नाव F.A.R.M. कॅफे. जो कोणी येईल त्याला मायेने खाऊ घालणारा हा कॅफे आहे अमेरिकेतल्या नाॅर्थ कॅरोलिना राज्यातील बून या शहरात. रेनी बोघमन या महिलेच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने हा F.A.R.M कॅफे २०१२ मध्ये सुरू झाला. रेनी काही प्रश्नांनी अस्वस्थ होती, त्या अस्वस्थेतून तिला हा कॅफे सुरू करण्याची कल्पना २००९ मध्ये सुचली.
४१ वर्षांपूर्वी रेनी निळ्या डोंगरांची रांग असलेल्या बून शहरात आली. जगण्यासाठी कमीत कमी पैसे लागणारं हे शहर. हीच या शहराची ओळख. बहुतांश माणसं मध्यमवर्गीय. पर्यटन कंपन्यांमध्ये नोकरी करणारी. अनेक जण दिवसभरात दोन-तीन नोकऱ्या करणारे. अनेक माणसं बेघर. जेमतेम कमावणाऱ्या माणसांच्या बळावर हे शहर किती बदलणार? पण रेनीला हे शहर सोडून जावंसं वाटलं नाही. इथला निसर्ग आणि जगण्याचा साधेपणा तिला आवडला. पाककलेचे शिक्षण घेऊन तिने वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये शेफ म्हणून काम केलं. हाॅटेलमध्ये काम करताना काही प्रश्नांनी रेनीला अस्वस्थ केलं. स्थानिक शेतकरी, विक्रेते यांच्याकडून माल घेऊन हाॅटेलमध्ये महागडे पदार्थ तयार होतात. धान्य पिकवणारे शेतकरीही खाऊ शकत नाहीत इतके ते महाग असतात.
खिशात पैसे असणाऱ्यांना चांगलंचुंगलं खायला मिळणार, गरिबांचं काय? त्यांनाही चांगलं, चवीचं, पौष्टिक खाण्याचा अधिकार नाही का? - या तळमळीतून रेनीला F.A.R.M. कॅफे सुरू करावासा वाटला. तिने ही कल्पना जमेल तितक्या लोकांपुढे मांडली. तिच्यासारख्या अनेक लोकांना ही कल्पना आवडली. लोकं देणगी देऊ लागले. रेनीसोबत अनेकांनी एकत्र येऊन F.A.R.M. कॅफेला आकार दिला.
‘फीड ऑल रिगार्डलेस ऑफ मिन्स’ म्हणजे कोणाकडे पैसे आहेत की नाही, याचा विचार न करता जो येईल त्याला पोटभर प्रेमाने आणि आदराने खाऊ घालणारे हे F.A.R.M. कॅफे. बूनमधील किंग स्ट्रीट येथील १०० वर्षं जुन्या इमारतीत बून ड्रग हे मेडिकल चालायचं. त्यांनी हे मेडिकल नवीन जागेत सुरू करण्याचं ठरवलं. या मेडिकलच्या मालकांना रेनीने आपली ही कॅफेची कल्पना सांगितली. त्यांनाही ती आवडली आणि ही जागा F.A.R.M. कॅफेला मिळाली. बूनमधला मोठा व्यावसायिक असो की एखाद्या कंपनीत काम करणारा साधा कर्मचारी असो सगळ्यांना ही जागा आपली वाटायला हवी अशा पद्धतीने हे कॅफे चालवण्याचं ठरलं. रेनीसोबत हाॅटेलमध्ये काम करण्यासाठी स्वयंसेवक येऊ लागले.
घरच्यासारखे उत्तम जेवण देणाऱ्या या F.A.R.M. कॅफेत रोजचा मेन्यू वेगळा असतो. त्यात सूप, स्टार्टर, दोन पदार्थ, एक गोड पदार्थ आणि साॅफ्ट ड्रिंक्स असा मेन्यू असतो. लोकांनी इथे यावं, एकमेकांशी बोलावं, आपली सुखंदु:खं एकमेकांना सांगत एकमेकांसोबत जेवणाचा आनंद घ्यावा, जगण्याची भ्रांत थोडी कमी व्हावी, या कॅफेचा हा उद्देश. कॅफेमधील जेवणाचा दर हा छोट्या-मोठ्या प्लेटनुसार ठरलेला. मोठ्या प्लेटसाठी १० डाॅलर्स आणि छोट्या प्लेट्साठी ७ डाॅलर्स. पण एवढे पैसे द्याच असा काही या कॅफेचा आग्रह नाही. जमेल तितके द्या. नाही दिले तरी चालतील. जेवणाच्या बदल्यात एक तास कॅफेमध्ये काम करा. फुकट जेवलो म्हणून ओशाळून जाण्याचं कारण नाही... असा या F.A.R.M. कॅफेचा साधासुधा नियम. F.A.R.M. कॅफेत तयार होणाऱ्या पदार्थांसाठीची धान्यं, फळं, भाज्या येथील स्थानिक शेतकऱ्यांकडून, विक्रेत्यांकडून घेतल्या जातात. जो येईल त्याला जेऊ घालणारं रेनीचं हे स्वयंपाकघर सुरू राहावं, यासाठी बून शहरातील कंपन्या, व्यवसाय, खाजगी व्यावसायिक F.A.R.M. कॅफेला देणगी देत आहेत. रोज या कॅफेत खिशात भरपूर पैसे असणारे आणि खिसा रिकामा असणारी लोकं एकत्र हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारत पोटभर जेवतात.