कोरोनासारख्या चुका पुन्हा नाही! WHO'ने चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन गूढ आजाराची माहिती मागवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 06:48 PM2023-11-23T18:48:29+5:302023-11-23T18:51:33+5:30
दोन वर्षापूर्वी कोरोनाने पूर्ण जगात थैमान घातले होते.
दोन वर्षापूर्वी कोरोनाने पूर्ण जगात थैमान घातले होते. कोरोनाचा प्रसार चीनमधून झाल्याचे समोर आले होते, कोरोनामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका भयानक आजार आला असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता जागतिक आरोग्य संघटना पुन्हा अॅक्शनमोडमध्ये आली आहे. डब्लूएचओने उत्तर चीनमधील न्यूमोनियाच्या उद्रेकाबाबत बीजिंगकडून अधिक माहिती मागवली आहे. मुलांना या आजाराचा सर्वाधिक त्रास होतो. "डब्लूएचओने मुलांमध्ये श्वसनाचे आजार आणि न्यूमोनियाच्या क्लस्टर्समध्ये वाढ झाल्याच्या अहवालांबद्दल तपशीलवार माहितीसाठी अधिकृत विनंती केली आहे.
देशात पाच राज्यांच्या निवडणुका, पण नेदरलँडच्या निकालाचीच चर्चा; कट्टर नेत्याची सत्ता
अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांपासून डिसेंबर महिन्यात चीनमध्ये इन्फ्लूएंझा सारख्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली, तर तीसुद्धा अशा वेळी जेव्हा येथे शून्य-कोविड धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली होती. चीनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शून्य-कोविड धोरण समाप्त केले.
श्वसनाचे आजार वाढले
WHO ने दिलेली माहिती अशी, 'चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला एका पत्रकार परिषदेत सांगितले की, श्वासोच्छवासाच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कोविड-19 रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा.
एका वृत्तानुसार, कोविड प्रतिबंधातील हलगर्जीपणामुळे केवळ कोविड-संबंधित आजारांमध्येच वाढ झाली नाही तर इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि व्हायरस सारख्या श्वसनसंस्थेसंबंधी रोगांमध्येही वाढ झाली आहे.
प्रो-मेड, ऑनलाइन वैद्यकीय समुदायाने २०२९ मध्ये वुहानमध्ये पसरणारा रोग ओळखला. नंतर ते कोविड-19 म्हणून ओळखले. त्याच गटाने उत्तर चीनमधून येत असलेल्या अज्ञात न्यूमोनियाच्या वाढत्या अहवालाकडे पुन्हा लक्ष वेधले. एका तैवान मीडिया आउटलेटने, बीजिंग, लिओनिंग आणि उत्तरेकडील इतर ठिकाणच्या बाल रुग्णालयांमध्ये "आजारी मुलांची गर्दी" असल्याचे वृत्त दिले आहे, तर काहींनी नोंदवले आहे की न्यूमोनियाने आजारी मुलांच्या पालकांनी "महामारी" बद्दल अधिकाऱ्यांवर खटला भरला आहे. परंतु WHO ने सध्याच्या परिस्थितीबद्दल अधिक तपशील मागितला आहे.
डब्ल्यूएचओने, आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन विभागामार्फत, मुलांमधील या नोंदवलेल्या क्लस्टर्समधून अतिरिक्त महामारीविषयक आणि निदान माहिती, तसेच अहवाल दिलेल्या प्रयोगशाळेतील निकालांवरील माहितीची विनंती केली आहे. २०१९ च्या उत्तरार्धात उद्भवलेल्या कोविड -19 महामारीला यापूर्वी अज्ञात न्यूमोनिया म्हणून लेबल केले होते. या आजाराचा अनुवांशिक कोड जानेवारी २०२० मध्ये पहिल्या मृत्यूनंतर सार्वजनिक करण्यात आला.