सॅलरी नाही, कारची चावी ड्रॉव्हरमध्ये आहे..; तालिबानला कंटाळलेल्या चीनमधील अफगाण राजदूताचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 04:43 PM2022-01-11T16:43:54+5:302022-01-11T16:44:25+5:30
तालिबानने परदेशातील अफगाण राजदूतांना पैसे पाठवणे बंद केले आहे.
अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान (Taliban) राजवट आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था (Economy) खराब झाली आहे. अमेरिकेने (America) अफगाणिस्तानचे अब्जावधी डॉलर्स रोखून धरले असून तालिबान आता अनेकांकडे पैशांसाठी हात पसरत आहे. दरम्यान, तालिबानने परदेशातील अफगाण राजदूतांना पैसे पाठवणे बंद केले आहे. यांची नियुक्ती अशरफ गनी यांच्या कार्यकाळादरम्यान झाली होती. तालिबाननं पैसे पाठवणे बंद केल्याने त्यांनाही आता आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व प्रकरणानंतर चीनमधील अफगाणिस्तानचे राजदूत जाविद अहमद कइम यांनी पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा सोशल मीडियावर (Social Media) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तानच्या राजदूताने आपल्या पत्रात खुलासा केला आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पगार दिला जात नव्हता. फोन कॉलला उत्तर देणारा केवळ एक रिसेप्शनिस्ट शिल्लक आहे.
The end to an honorable responsibility: I quit my job as Ambassador. It was an honor to represent AFG 🇦🇫 and my people.There are many reasons, personal and professional, but I don’t want to mention them here. I have handed over everything smoothly through a handover note. pic.twitter.com/a4A6y7yOBP
— Javid Ahmad Qaem (@JavidQaem) January 10, 2022
६ महिन्यांपासून वेतन नाही
'गेल्या ६ महिन्यांपासून आम्हाला काबूलमधून कोणताही पगार मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आर्थिक संकट सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती,' असं त्यांनी ट्विटरद्वारे म्हटलं होतं. १ जानेवारी रोजी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला त्यांनी यासंदर्भातील पत्र पाठवले होते, मात्र सोमवारी ट्वीट करून ते त्यांनी जगासमोर आणले. राजदूत जाविद यांनी त्यांच्या उत्तराधिकारींसाठी काही पैसे ठेवले आहेत. ते म्हणाले, 'आज १ जानेवारी २०२२ पर्यंत बँक खात्यात १ लाख डॉलर शिल्लक आहेत.' पुढे कुठे जाणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.
अनेक अफगाण दुतावासात हीच परिस्थिती
जाविदच्या पत्राद्वारे त्यांनी दूतावासाच्या ५ गाड्यांच्या चाव्या आपल्या कार्यालयात सोडल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सर्वजण निघून गेल्यानंतर लोकांच्या फोन कॉलला उत्तर देण्यासाठी त्यांनी स्थानिक कर्मचाऱ्याचीही नियुक्ती केली आहे. जगभरातील बहुतेक अफगाण दूतावासांमध्येही अशीच परिस्थिती आहे. हे दूतावास आजही पूर्वीच्या अशरफ गनी सरकारशी एकनिष्ठ असलेले लोक चालवतात. तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर अनेक अफगाण अधिकारी चीन सोडून गेले. त्यांनी आपल्या राजीनाम्याला “सन्माननीय जबाबदारीचा अंत” म्हटल्याचं जाविद म्हणाले. "माझा विश्वास आहे की जेव्हा नवी व्यक्ती त्या ठिकाणी येईल तेव्हा तिकडे जुन्या अधिकाऱ्यांपैकी कोणीही अधिकारी शिल्लक राहणार नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
तालिबानकडून प्रतिक्रिया नाही
जाविद यांच्या जागी तालिबानकडून कोणाला राजदूत म्हणून नियुक्त केले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या राजीनाम्यावर तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये जाविद यांची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तालिबानच्या शिष्टमंडळाच्या चीन भेटीवर चिंताही व्यक्त केली होती. त्याच्याच काही आठवड्यांनंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला.