किम जोंग यांच्यावर ना शस्त्रक्रिया, ना उपचार; दक्षिण कोरियाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:00 AM2020-05-04T01:00:20+5:302020-05-04T07:28:02+5:30
उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसार माध्यमांनी जारी केलेल्या व्हिडिओ फितीत किम जोंग ऊन दिसल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांना विराम लागला होता.
सेऊल : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही किंवा अन्य वैद्यकीय उपचार करण्यात आले नाहीत, असा खुलासा दक्षिण कोरियाच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. ते शुक्रवारी प्याँगयांगनजीक खत कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. तब्बल वीस दिवसांनी त्यांचे सार्वजनिक दर्शन घडल्यानंतर किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल अफवा थांबताना दिसत नाहीत.
उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसार माध्यमांनी जारी केलेल्या व्हिडिओ फितीत किम जोंग ऊन दिसल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांना विराम लागला होता. तथापि, काही माध्यमे आणि निरीक्षक त्यांच्या प्रकृतीविषयी अजूनही प्रश्न उपस्थित करीत आहेत. कारखान्याच्या उद्घाटन कार्यक्रमांत त्यांची चाल अवघडलेली वाटत होती. दक्षिण कोरिया राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने रविवारी स्पष्ट केले की, किम जोंग ऊन यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. तसेच अन्य कोणतेही वैद्यकीय उपाचार करण्यात आले नाहीत.
उत्तर कोरियातील घडामोडींना दुजोरा देण्यात दक्षिण कोरियाने आपल्या भूमिकेत आजवर सातत्य राखलेले नाही. तथापि, किम जोंग ऊन यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवा निराधार ठरविताना दक्षिण कोरियाने ठामपणे उत्तर कोरियात कोणत्याही संशयास्पद घडामोडी घडत नसल्याची ग्वाही दिली होती. किम जोंग हे पहिल्यांदाच दृष्टीस पडले नाहीत, असे नाही. २०१४ मध्येही ते सहा आठवडे बेपत्ता होते.