...तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही; इम्रान खाननी आळवला पुन्हा 'काश्मीर' राग
By देवेश फडके | Published: January 11, 2021 12:19 PM2021-01-11T12:19:53+5:302021-01-11T12:22:11+5:30
जम्मू-काश्मीरला स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. इस्लामाबाद येथे ते बोलत होते.
इस्लामाबाद :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावर भाष्य केले आहे. इस्लामाबाद येथे डिजिटल मीडिया प्रतिनिधींशी बोलताना इम्रान खान यांनी काश्मीर राग आळवला असून, जम्मू-काश्मीरला स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
डिजिटल मीडिया प्रतिनिधींशी चर्चा करताना, भारतासोबत पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाना उत्तर देताना इम्रान खान यांनी भूमिका स्पष्ट केली. जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही. भारत सोडल्यास अन्य कोणताही देश आमचे शत्रूराष्ट्र नाही. पाकिस्तानात अस्थिरता माजवण्याचे प्रयत्न भारताकडून केले जात आहेत, असा आरोप इम्रान खान यांनी यावेळी केला.
भारताने शांतता प्रस्थापित करण्याबाबतीत एक पाऊल पुढे टाकायचे सोडून काश्मीरचा भूभाग हडपला आहे. भारताकडून काश्मिरी नागरिकांवर सातत्याने अन्याय केला जात आहे, असा दावाही इम्रान खान यांनी केला. दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करत असलेले अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. तेव्हापासून वारंवार अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी पाकिस्तानसह अनेकांकडून केली जात आहे. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे हा अंतर्गत मुद्दा पाकिस्तानचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे यापूर्वी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट केले आहे.