'युद्ध नाही, प्रत्येक समस्या शांततेने सोडवायला हवी'; रशिया-युक्रेन युद्धावर पीएम मोदी म्हणाले,...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 06:33 PM2024-10-22T18:33:57+5:302024-10-22T18:36:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने काझान येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी मंगळवारी रशियातील कझान येथे पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ व्या ब्रिक्स परिषदेसाठी काझान दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी काझान येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पीएम मोदी म्हणाले की, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या विषयावर मी सतत संपर्कात आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, आमचा विश्वास आहे की समस्या शांततेने सोडवल्या पाहिजेत. समस्यांचे समाधाना शांततेत मिळते, यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये मानवतेला प्राधान्य दिले जाते. भारत आगामी काळात सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुमच्या मैत्रीबद्दल, स्वागतासाठी आणि आदरातिथ्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी कझानसारख्या सुंदर शहरात येण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. या शहराशी भारताचे खोल आणि ऐतिहासिक संबंध आहेत. कझानमध्ये भारताचे नवीन वाणिज्य दूतावास सुरू झाल्याने हे संबंध अधिक दृढ होतील, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, आंतर-सरकारी आयोगाची पुढील बैठक १२ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. आमचे प्रकल्प सतत विकसित होत आहेत. तुम्ही कझानमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. भारताच्या धोरणांमुळे आमच्या सहकार्याचा फायदा होईल. तुम्हाला आणि तुमच्या शिष्टमंडळाला रशियामध्ये पाहून आम्हाला खूप आनंद झाला.