इराणशी युद्ध नाही -डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:26 AM2020-01-02T02:26:33+5:302020-01-02T02:26:43+5:30
हल्ल्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीस इराणला जबाबदार धरले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
वॉशिंग्टन : बगदादमधील अमेरिकेच्या राजदूतावासावर इराकमधील हजारो शिया निदर्शकांनी मंगळवारी हल्ला चढविला. या निदर्शकांना इराणचे समर्थन आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीस इराणला जबाबदार धरले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. मात्र, इराणशी अमेरिका युद्ध करण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
बगदाद येथे शिया निदर्शकांनी हल्ला चढवून अमेरिकन राजदूतावासाच्या कुंपणभिंतीची नासधूस केली. मात्र, कडक बंदोबस्तामुळे त्यांना राजदूतावासाच्या मुख्य इमारतीचे फार नुकसान करता आले नाही. इराकमधील हशद-अल्-शाबी या शिया गटाच्या कार्यकर्त्यांना इराणने शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले आहे. या संघटनेचे हजारो निदर्शक हाती इराकचा राष्ट्रध्वज घेत राजदूतावासावर चालून गेले. अमेरिकेचा अंत करणार, अशा घोषणा निदर्शक देत होते. या घटनेमुळे संतप्त झालेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे.
मात्र, इराणशी युद्ध करण्याचा अमेरिकेचा कोणताही विचार नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.(वृत्तसंस्था)
सुरक्षाव्यवस्थेत वाढ
याआधीही इराणच्या अमेरिकाविरोधी कारवायांबाबत ट्रम्प यांनी त्या देशाला धारेवर धरले होते. अमेरिकेच्या दूतावास किंवा अन्य कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्याची मोठी किंमत इराणला चुकवावी लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.
इराकमध्ये शिया निदर्शकांनी केलेला हल्ला लक्षात घेऊन बगदादमधील अमेरिकी राजदूतवासाच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तिथे आता ७५० अमेरिकन सैनिक तैनात करण्यात येतील.
अमेरिकी राजदूतावासावर हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकचे पंतप्रधान आदिल अब्द अल्-महदी यांच्याशी दूरध्वनीवरून मंगळवारी चर्चा केली.