पिण्यासाठी पाणी मिळेना... दोन देशांत युद्ध? तालिबानने सीमेवर हजारो सैनिक, आत्मघाती हल्लेखोर पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:00 AM2023-08-09T06:00:00+5:302023-08-09T06:00:15+5:30
इराणमध्ये सध्या भीषण दुष्काळ पडला असून, अफगाणिस्तानसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जलतंट्यामुळे ही समस्या अधिक चिघळली आहे.
तेहरान : इराण व अफगाणिस्तानात हेलमंद नदीच्या पाण्यावरून युद्ध पेटण्याची चिन्हे आहेत. जलवाटप कराराचा आदर करा, अन्यथा परिणामांना तयार राहा, असा इशारा इराणने दिल्यानंतर तालिबानने थेट युद्धाची तयारीच सुरू केली आहे. हजारो सैनिक व आत्मघाती हल्लेखोरांना सीमेवर पाठविण्यात आले असून, अमेरिकेने मागे सोडलेली वाहने आणि शस्त्रेही सीमेकडे नेली जात आहेत.
इराणमध्ये सध्या भीषण दुष्काळ पडला असून, अफगाणिस्तानसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जलतंट्यामुळे ही समस्या अधिक चिघळली आहे. तालिबान हेलमंद नदी पाणीवाटप कराराची अंमलबजावणी करत नसल्याचा इराणचा दावा आहे. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी तालिबानला एकतर कराराचा आदर करा, अन्यथा परिणामांना तयार राहा, असा इशारा दिला होता.
या इशाऱ्यानंतर नुकतीच इराण व तालिबानमध्ये सीमेवर चकमक झाली. त्या चकमकीमुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. तालिबान मागे हटण्यास तयार नाही. त्याने युद्धाची तयारी चालवली आहे. हजारो सैनिक व शेकडो आत्मघाती हल्लेखोर सीमा भागात पाठवण्यात आले आहेत. सोबतच अमेरिकेने मागे सोडलेली वाहने आणि शस्त्रेही पाठवण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)
इराण म्हणतो : आम्हाला फक्त ४% पाणी मिळाले
हेलमंद नदीच्या पाणीवाटपाबाबत उभय देशांत १९७३ मध्ये करार झाला होता; पण या कराराची अंमलबजावणीही झाली नाही. अफगाणिस्तानमधील इराणचे राजदूत हसन काझेमी कोमी यांनी म्हटले आहे की, इराणला गेल्या वर्षी केवळ चार टक्के पाणी मिळाले आहे. आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी अफगाणिस्तानने हेलमंड नदीवर अनेक ठिकाणी धरणे बांधली आहेत.
९७%
इराणमध्ये दुष्काळाचे चटके, स्थलांतर वाढले
१०
हजारांहून अधिक कुटुंबांनी राजधानीतून पलायन केले होते.