‘लो कार्बन एलईडी’साठी जपानी संशोधकांना नोबेल
By Admin | Published: October 8, 2014 02:51 AM2014-10-08T02:51:26+5:302014-10-08T02:51:26+5:30
इसामु अकासाकी , हिरोशी अमानो व शुजी नाकामुरा या तीन शास्त्रज्ञांना कमी कार्बनच्या एलईडी दिव्याच्या संशोधनासाठी यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे
स्टॉकहोम : इसामु अकासाकी , हिरोशी अमानो व शुजी नाकामुरा या तीन शास्त्रज्ञांना कमी कार्बनच्या एलईडी दिव्याच्या संशोधनासाठी यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणाला लाभदायक ठरणाऱ्या उर्जेच्या नव्या स्त्रोताच्या संशोधनासाठी त्यांची निवड करण्यात आली. हा शोध लावणारे तिघेही संशोधक जपानी आहेत. त्यांचा हा शोध जागतिक तापमानवाढीच्या विरोधातील लढ्यात उपकारक ठरणार आहे. किमतीच्या बाबतीत हा दिवा गरीबांना परवडेल इतका किफायतशीर आहे.
हे तीनही संशोधक सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांच्या संशोधनातून सिद्ध झालेला हा एलईडी (लाईट एमिटिंग डिओड) दिवा निळा प्रकाश देतो. हे संशोधन क्रांतीकारी असल्याचे पुरस्काराची घोषणा करणाऱ्या परीक्षकांनी म्हटले आहे. २० व्या शतकात आधुनिक लाईट बल्ब आले, २१ वे शतक एलईडी लॅम्पचे आहे, असही परीक्षकांनी म्हटले
आहे.
जगभरात जी ऊर्जा वापरली जाते, त्यापैकी १९ टक्के ऊर्जा प्रकाशासाठी वापरली जाते. त्या ऊर्जेत बचत करण्याचे मोलाचे काम या संशोधनामुळे शक्य होणार असल्याचाही परीक्षकांनी आवर्जून उल्लेख केला आहे.
या तीन संशोधकांनी १९९०च्या दशकाच्या पूर्वार्धात सेमीकंडक्टरमधून निळे प्रकाशकिरण तयार करण्यात यश आले होते. प्रकाशाच्या तंत्रज्ञानातील हे मूलभूत बदल ठरले असे ज्युरींचे म्हणणे आहे. लाल व निळे प्रकाश फार पूर्वीपासून होते, पण निळ्या प्रकाशाअभावी पांढरे दिवे तयार करणे शक्य नव्हते.
निळा एलईडी तयार करणे हे तीन दशकांसाठी आव्हान होते, त्यात या तीन शास्त्रज्ञांना यश मिळाले. एलईडी लॅम्प दीर्घकाळ टिकणारे असून, आधीच्या प्रकाशस्त्रोतांना हा सक्षम पर्याय मिळणार आहे. थॉमस एडीसनने १९ व्या शतकात शोध लावलेल्या व आजही वापरात असलेल्या वीजेच्या दिव्यांच्या तुलनेत एलईडी लॅम्पसाठी फार कमी उर्जा लागेल व ते दीर्घकाळ टिकतील. सौर उर्जेवरही हे दिवे चालू शकतात, जगातील वीज उपलब्ध नसणाऱ्या १५ कोटी लोकांसाठी हे वरदान ठरणार
आहे.
गेल्यावर्षी गॉड पार्टिकल (इश्वरी कण) चा शोध लावणाऱ्या पीटर हिग्ज (इंग्लंड) व फ्रँकोईस इंग्लेट (बेल्जियम) या शास्त्रज्ञाना भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते. गॉड पार्टिकल (हिग्ज बोसॉन) हा अणु इतर अणुंना घनता देतो.
परंपरेनुसार स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी, १० डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. ८० लाख क्रोनर (११लाख अमेरिकी डॉलर) ही पुरस्काराची रक्कम तीन विजेत्यांत विभागून दिली जाणार आहे. (वृत्तसंस्था)