नोबेल पारितोषिक विजेत्या 'आंग सान सू कीं'ना 5 वर्षांचा तुरुंगावास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:21 AM2022-04-27T11:21:04+5:302022-04-27T11:22:20+5:30
सू की यांना यापूर्वी भ्रष्टाचारप्रकरणी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
म्यानमार - म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांना तेथील न्यायालयाने 5 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्यामुळे मिलिट्री न्यायालायने त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 76 वर्षीय सान सू की यांना तब्बल 6 लाख डॉलर कॅश आणि सोनं लाच घेतल्यामुळे दोषी ठरविण्यात आले आहे. सू की यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची एकूण 11 प्रकरणे आहेत.
सू की यांना यापूर्वी भ्रष्टाचारप्रकरणी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लष्कराविरुद्ध असंतोष भडकवल्याबद्दल आणि कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं होतं. म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021 च्या रात्री लष्कराने सू की यांना सत्तापालट करुन अटक केली होती. 1 फेब्रुवारी रोजी लष्कराने देशात प्रवेश केल्यापासून 76 वर्षीय सू की लष्कराच्या ताब्यात आहेत. गतवर्षी त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, सू की यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या वृत्ताला एका विधी अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. राजधानी नेपूता येथे एका बंद खोलीत सू की यांच्यावरील खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.
मान्यमारमध्ये सत्ता पालटानंतर लष्करी नेते जनरल मिन आंग हुलिंग हे देशाचे पंतप्रधान बनले आहेत. तेव्हा बोलताना जनरल हुलिंग म्हणाले की, देशातील आणीबाणी 2023 मध्ये हटवली जाईल आणि सार्वत्रिक निवडणुका होतील. या सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता, ज्यात 940 लोकांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर 2020 मध्ये म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये सू की यांच्या पक्षाने दोन्ही सभागृहात 396 जागा जिंकल्या होत्या.