नोबेल विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 06:53 AM2024-08-07T06:53:56+5:302024-08-07T06:55:34+5:30
या बैठकीत आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तिन्ही दलाचे प्रमुखही उपस्थित होते.
बांगलादेशात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळानंतर, अंतरिम सरकार स्थापन होत आहे. नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद युनूस यांना बांगलादेशमध्ये स्थापन होणाऱ्या या अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी निवडण्यात आले आहे. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली बंगा भवनात (राष्ट्रपती भवन) झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोहम्मद युनूस यांच्याकडे अंतरिम सरकारचे नेतृत्व देण्यासंदर्भातील प्रस्ताव आंदोलक विद्यार्थ्यांनीही स्वीकारला आहे. या बैठकीत आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तिन्ही दलाचे प्रमुखही उपस्थित होते.
महत्वाचे म्हणजे, गरिबीशी लढण्यात 'बँकर ऑफ द पुअर' म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून आंदोलक विद्यार्थ्यांची पहिली पसंती होते.
शेख हसिना यांच्यावर युनूस यांचा निशाणा -
युनूस हे नेहमीच शेख हसीना याचे कट्टर विरोधक राहिले आहेत. त्यांच्यावर टीकाही करत आले आहेत. आता शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर, द प्रिंटला दिलेल्या एका मुलाखतीत, त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन हा बांगलादेशचा दुसरा मुक्तीसंग्राम होता. हसीना देश सोडून गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत. आम्ही एक स्वतंत्र देश आहोत. जोवर त्या येथे होत्या आम्ही त्यांच्या ताब्यात होतो. त्या एका हुकुमशहा प्रमाणे वागत होत्या. सर्व काही नियंत्रणात ठेवत होती, असे युनूस यांनी म्हटले आहे.
कोण आहेत मोहम्मद युनूस? -
मोहम्मद युनूस हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर विरोधक आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडण्यामागे असलेल्या मुख्य कारणांपैकी युनूस देखील एक कारण असल्याचे मानले जात आहे.
२८ जून १९४० रोजी मोहम्मद युनूस यांचा जन्म झाला. युनूस हे बांगलादेशातील उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ आणि सामाजिक नेते आहेत. गरीबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी युनूस यांना २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. युनूस यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनूस यांनी १९८३ मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली, जी गरीब लोकांना लहान कर्ज देते. बांगलादेशला त्याच्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून मायक्रोक्रेडिटसाठी जगभरात प्रशंसा मिळाली. त्यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश आले.
भारतावर केली होती टीका -
सरकार कोसळण्याच्या आदल्याच दिवशी मोहम्मद युनूस यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. आंदोलसंदर्भात भारताने घेतलेल्या भूमिकेबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. भारताने बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांवर भाष्य करण्यास नकार दिला होता. "ही देशांतर्गत बाब असल्याचे भारत म्हणतो तेव्हा मला वाईट वाटते. तुमच्या भावाच्या घराला आग लागली असेल तर तुम्ही त्याला घरगुती बाब कसे म्हणू शकता? अनेक गोष्टी मुत्सद्देगिरीत येतात आणि हा त्यांचा देशांतर्गत मुद्दा आहे असे म्हणता येणार नाही. बांगलादेशातील अशांतता शेजारील देशांमध्येही पसरू शकते," असे मोहम्मद युनूस यांनी म्हटले होतो.