राजेंद्र सिंह यांना पाण्याचे नोबेल...
By Admin | Published: March 21, 2015 11:55 PM2015-03-21T23:55:25+5:302015-03-21T23:55:25+5:30
भगीरथ प्रयत्नांनी अनेक गावांची तहान भागविणारे आणि जलपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्र सिंह यांना २०१५ चा स्टॉकहोम पाणी पुरस्कार घोषित करण्यात आला.
स्टॉकहोम : भगीरथ प्रयत्नांनी अनेक गावांची तहान भागविणारे आणि जलपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्र सिंह यांना २०१५ चा स्टॉकहोम पाणी पुरस्कार घोषित करण्यात आला. पाणीवाले बाबा म्हणून ते ओळखले जातात. हा पुरस्कार नोबेलसारखाच समजला जातो. भारतातील जल संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १५०,००० डॉलर आणि विशेष मानचिन्ह असे आहे. २६ आॅगस्ट रोजी जागतिक जल सप्ताहादरम्यान त्यांना या पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे.
दुष्काळावर मात करीत लोकांना सशक्त करण्याचा विडा उचलत राजेंद्र सिंह हे गेल्या २० वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत आहेत. २००१ मध्ये त्यांना रेमन ‘मॅगेसेसे’ने गौरविण्यात आले होते. तरुण भारत संघ नावाची त्यांची स्वयंसेवी संस्था आहे. वसुंधरेचे रक्षण करणाऱ्या ५० लोकांत दी गार्डियनने त्यांचा समावेश केला होता. केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पाण्याची समस्या सुटणार नाही. सहभागीदारी, महिला सशक्तीकरण आणि पारंपरिक पद्धतीशी स्वदेशी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता येईल, यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, अशा शब्दांत स्टॉकहोम वॉटर प्राईज कमिटीने त्यांचा गौरव केला आहे.