मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्यांना शांततेचे नोबेल; बेलारूस, युक्रेन, रशियातील कार्यकर्ते, दोन संस्थांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 09:23 AM2022-10-08T09:23:47+5:302022-10-08T09:24:46+5:30
युक्रेनवर युद्ध लादणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार घोषित झाला.
ऑस्लो : मानवी हक्कांच्या जपणुकीसाठी अविरत संघर्ष करणारे व सध्या तुरुंगवासात असलेले बेलारूसमधील एक कार्यकर्ते ॲलेस बिलियात्स्की तसेच रशियातील मेमोरियल हा गट, युक्रेनमधील सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज ही संस्था अशा तीन जणांना यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. युक्रेनवर युद्ध लादणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा शुक्रवारी, ७ ऑक्टोबर रोजी ७० वा वाढदिवस होता. त्याच दिवशी शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार घोषित झाला.
सन्मानमूर्ती तुरूंगातच
बेलारुसमधील मानवी हक्क कार्यकर्ते ॲलेस बिलियात्स्की देशात लोकशाही प्रस्थापित व्हावी म्हणून १९८० च्या दशकापासून प्रयत्नशील आहेत. त्यांनी विआस्ना ही संघटना स्थापन केली. त्यासाठी ॲलेस बिलियात्स्की यांना राईट लाइव्हलीवूड पुरस्कार २०२० साली प्रदान करण्यात आला. सरकारविरोधात निदर्शने केल्याने बिलायात्स्की यांना तुरुंगात धाडण्यात आले. त्यांची सुटका करावी, अशी मागणी नोबेल पुरस्कार समितीने केली आहे.
मेमोरियल गट
सोव्हिएत रशिया अस्तित्वात असताना १९८७ साली मेमोरियल या गटाची स्थापना झाली. कम्युनिस्ट राजवटीत झालेल्या अत्याचारांमुळे ज्यांचा मृत्यू ओढवला त्यांची माहिती संकलित करण्याचे काम या गटातर्फे सुरू असते. तसेच रशियातील राजकीय कैद्यांच्या स्थितीबाबतही हा गट माहिती जमविण्याचे काम करतो.
सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज
युक्रेनमध्ये २००७ साली स्थापन झालेल्या सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थेने लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी व मानवी हक्क जपण्यासाठी उत्तम कार्य केले आहे. युक्रेनमधील नागरिकांवर युद्धादरम्यान रशियाने केलेल्या अत्याचारांची नोंद ठेवण्याचे महत्त्वाचे काम या संस्थेने सुरू केले आहे.
बिलियात्स्की यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बेलारूस सरकारने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये तसेच बीलियात्स्की यांची तुरुंगातून लवकरात लवकर सुटका करण्यात यावी. - बेरिट रिट अँडरसन, अध्यक्षा, नोबेल समिती
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"