शांततेचा नोबल पुरस्कार विजेती मलाला युसूफजई विवाहबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:17 AM2021-11-11T10:17:56+5:302021-11-11T10:20:02+5:30
लंडन: मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविणाऱ्या आणि सतराव्या वर्षी शांततेच्या नोबल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या, तसेच मानवी हक्कासाठी लढा देणाऱ्या पाकिस्तानी ...
लंडन: मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविणाऱ्या आणि सतराव्या वर्षी शांततेच्या नोबल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या, तसेच मानवी हक्कासाठी लढा देणाऱ्या पाकिस्तानी कार्यकर्ती मलाला युसूफजई या ब्रिटनमधील बर्मिंंघममध्ये छोट्याशा समारंभात विवाहबद्ध झाल्या.
विवाहबद्ध झाल्याची घोषणा करताना मलालाने ट्विटवर पती असर मलिक आणि कुटुंबीयांसोबतचे काही फोटोही टाकले आहेत. फिक्कट गुलाबी रंगाचा सूट आणि काही दागदागिने परिधान केलेली मलाला बर्मिंघम येथील आपल्या घरात विवाहाचे काही विधी पार पाडताना दिसते.
ट्विटवर मलालाने म्हटले आहे की, ‘‘आज माझ्या आयुष्यातील अत्यंत बहुमोल दिवस आहे. मी आणि असर एकमेकांचे जीवनसाथी बनलो आहेत. आम्ही आमच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत बर्मिंघममध्ये घरातच एका छोट्याशा समारंभात विवाहबद्ध झालो. आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही एकमेकांच्या साथीने आयुष्याची पुढची वाटचाल करण्यास उत्साहित आहोत. मलाला आणि असर मलिक यांची दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती. तेव्हापासून ते एकामेकांच्या संपर्कात होते, नंतर आपापल्या कुटुंबीयांच्या संमतीने विवाहबद्ध होण्याच निर्णय घेतला.
पती असर मलिक यांचे क्रिकेटशीही संबंध-
मलाला युसूफजई यांचे पती असर मलिक यांचे शालेय आणि उच्चशिक्षण पाकिस्तानातच झाले आहे. असर मलिक यांचे क्रिकेटशीही संबंध आहेत. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (पीसीबी) जनरल मॅनेजर हाय परफॉर्मन्स पदावर आहेत. २०२० मध्ये ते पीसीबीत दाखल झाले. त्या आधी ते प्लेअर मॅनेजमेन्ट एजन्सीत मॅनेजिंग डायरेक्टर होते. असर मलिक यानी नाट्य निर्मिती कंपनी ड्रामालाइनचे प्रेसिडेन्ट म्हणूनही काम केले आहे.