लोकशाही समर्थक नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की यांना 4 वर्षांचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 01:00 PM2021-12-06T13:00:08+5:302021-12-06T15:06:59+5:30
म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांच्यावर देशातील नागरिकांना सैन्याविरोधात भडकावल्याचा आरोप आहे.
म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लष्कराविरुद्ध असंतोष भडकवल्याबद्दल आणि कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे. म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021 च्या रात्री लष्कराने सू की यांना सत्तापालट करुन अटक केली होती.
सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, माजी राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांनाही याच आरोपाखाली चार वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, परंतु त्यांना अद्याप तुरुंगात टाकलेलं नाही. 1 फेब्रुवारी रोजी लष्कराने देशात प्रवेश केल्यापासून 76 वर्षीय सू की लष्कराच्या ताब्यात आहेत. आता त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सत्ता पालटानंतर लष्करी नेते जनरल मिन आंग हुलिंग हे देशाचे पंतप्रधान बनले आहेत. याबाबत बोलताना जनरल हुलिंग म्हणाले की, देशातील आणीबाणी 2023 मध्ये हटवली जाईल आणि सार्वत्रिक निवडणुका होतील. या सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता, ज्यात 940 लोकांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर 2020 मध्ये म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये सू की यांच्या पक्षाने दोन्ही सभागृहात 396 जागा जिंकल्या होत्या.
शेकडो लोक मारले गेले
स्थानिक वॉचडॉग ग्रुपच्या म्हणण्यानुसार, सत्तापालटानंतर देशात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. या लोकांचा आवाज दाबण्यासाठी लष्कराने हिंसक पद्धतींचा वापर केला. ज्यामध्ये 1300 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि 10,000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मात्र तरीही देशातील अनेक भागात आंदोलने थांबत नाहीत.