अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 05:50 AM2024-10-08T05:50:23+5:302024-10-08T05:51:56+5:30
शरीरातील अवयवांचा विकास व त्यांचे कार्य याकरिता हा शोध अतिशय महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.
स्टॉकहोम : मायक्रोआरएनए व त्याच्या कार्याच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस व गॅरी रुवकून यांना वैद्यकशास्त्रासाठी असलेला यंदाचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. जनुकांचे कार्य मायक्रोआरएनएद्वारे कसे नियंत्रित केले जाते याचा शोध या दोघांनी घेतला. हा नोबेल पुरस्कार १.१ स्वीडीश क्रोनर (८ कोटी ६८ लाख रुपये) इतक्या रकमेचा आहे. शरीरातील अवयवांचा विकास व त्यांचे कार्य याकरिता हा शोध अतिशय महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.
व्हिक्टर ॲम्ब्रोस यांनी मायक्रोआरएनएबाबत केलेल्या संशोधनामुळे त्यांना हार्वर्ड विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. सध्या ते मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूल विद्यापीठात नैसर्गिक विज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत.
संशोधक गॅरी रुवकून यांनी मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये आपले संशोधन कार्य केले. ते हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये अनुवंशशास्त्राचे प्राध्यापक आहेत, असे नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी सांगितले.
वैद्यकशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार
वैद्यकशास्त्रासाठीच्या यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यापूर्वी पर्लमन यांनी रुवकुन यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या वैद्यकशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी ॲम्ब्रोस यांच्यासोबत तुमच्याही नावाची निवड करण्यात आली आहे, असे सांगताच रुवकीन यांनी आनंद व्यक्त केला, असे पर्लमन म्हणाले.
भौतिकशास्त्रासाठीच्या नोबेलची आज घोषणा
नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. उद्या, मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्यासाठीच्या नोबेल पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा करण्यात येईल. येत्या शुक्रवारी शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराच्या आणि सोमवारी, १४ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा केली जाईल. नोबेल पुरस्कार प्रदान सोहळा दि. १० डिसेंबर रोजी आयोजिण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)