दक्षिण कोरियाच्या लेखिकेला नोबेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 09:39 AM2024-10-11T09:39:25+5:302024-10-11T09:39:25+5:30
नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सन यांनी म्हटले की, महिलांच्या जीवनाबद्दल हान कांग यांनी उत्तम लेखन केले आहे.
स्टॉकहोम : दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना साहित्यासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल समितीने ही घोषणा गुरुवारी केली. हान कांग यांनी ऐतिहासिक घटना, आव्हाने यांच्याबद्दल लिहिताना मानवी जीवनातील नाजूक भावना, हळवेपणा, वास्तववाद यांचे उत्तम चित्रण केले. हान कांग यांनी दी व्हेजिटेरियन, दी व्हाइट बुक, ह्युमन ॲक्ट्स आणि ग्रीक लेसन आदी पुस्तके लिहिली आहेत.
नोबेल समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सन यांनी म्हटले की, महिलांच्या जीवनाबद्दल हान कांग यांनी उत्तम लेखन केले आहे. त्यांना शरीर, आत्मा तसेच मृत्यू यांच्या संबंधांची जाणीव आहे. नोबेल साहित्य समितीच्या सदस्य ॲना कॅरिन पाम म्हणाल्या की, कांग यांची लेखनशैली कधी हळुवार तर कधी उग्र स्वरूपाची असते. त्यांच्या लेखनात वास्तववादही डोकावतो. साहित्यासाठीचा नोबेल जाहीर झालेल्या हान कांग या द. कोरियाच्या पहिल्या लेखिका ठरल्या आहेत. (वृत्तसंस्था)