मेंदूतील ‘जीपीएस’ शोधणाऱ्यांना नोबेल
By admin | Published: October 7, 2014 05:55 AM2014-10-07T05:55:44+5:302014-10-07T06:04:35+5:30
अमेरिकी-ब्रिटिश वैज्ञानिक जॉन ओ’ किफे आणि मे-ब्रिट मोसर व एडवर्ड मोसर या नॉर्वेच्या संशोधक दाम्पत्याची वैद्यकशास्त्रातील यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली
स्टॉकहोम : अमेरिकी-ब्रिटिश वैज्ञानिक जॉन ओ’ किफे आणि मे-ब्रिट मोसर व एडवर्ड मोसर या नॉर्वेच्या संशोधक दाम्पत्याची वैद्यकशास्त्रातील यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे नोबेल अकादमीने सोमवारी येथे जाहीर केले. सभोवतालच्या परिस्थितीचे अचूक भान ठेवून आपण ज्यामुळे निर्धोकपणे वावरू शकतो, त्या मेंदूतील ‘अंतस्थ जीपीएस’चा शोध लावल्याबद्दल या तिघांचा सन्मान करण्यात येत असल्याचे अकादमीने म्हटले आहे. या शोधामुळे अल्झायमरसारख्या आजाराविषयी जाण वाढण्यासही मदत झाली आहे.
ओ’किफे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील ‘सेन्सबरी वेलकम सेंटर इन न्युरल सर्किट््स अॅण्ड बिहेवियर’चे संचालक आहेत, तर मोसर पती-पत्नी नॉर्वेमधील थ्राँडीम शहरातील वैज्ञाानिक संस्थांमधील संशोधक आहेत. एकाच वेळी नोबेलचे मानकरी ठरलेल्या पियरे क्युरी आणि मादाम क्युरी या फ्रेंच दाम्पत्यासह काही निवडक जोडप्यांच्या मानाच्या पंक्तीत मोसर दाम्पत्याने स्थान पटकावले आहे. आठ दशलक्ष स्वीडिश क्राऊन्स (१.१ दशलक्ष अमेरिकी डॉलर) एवढ्या रकमेचा हा पुरस्कार या तिघांना विभागून दिला जाईल. आपल्या सभोवतालच्या परिसराचा नकाशा मेंदू कसा तयार करतो व त्या गुंतागुंतीच्या भवतालातून तो आपले मार्गक्रमण कसे अचूकपणे घडवूून आणतो, याचे कोडे तत्त्वचिंतकांना आणि वैज्ञानिकांना कित्येक शतके पडले होते. ओ’किफी आणि मोसर दाम्पत्याच्या परस्पर पूरक संशोधनाने हे कोडे उलगडण्यास मदत झाली आहे, असे अकादमीने पुरस्कार जाहीर करताना नमूद केले. मेंदूच्या ‘हिप्पोकॅम्पस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील काही ठरावीक पेशी सभोवतालच्या ठरावीक स्थळाचे अंतर, स्वरूप व प्रकार याचे भान करून देतात व ठरावीक स्थळाचे भान करून देताना ठरावीक पेशीच कार्यान्वित होतात, असे मूलभूत संशोधन करून ओ’किफे यांनी मेंदूतील ‘जीपीएस’ यंत्रणा जाणून घेण्याचा पाया १९७१ मध्ये रचला.